शिवरायांच्या गड-किल्ल्यांपेक्षा शनिवारवाडा भाड्याने द्या, राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन

शिवरायांच्या गड-किल्ल्यांपेक्षा शनिवारवाडा भाड्याने द्या, राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शनिवारवाडा इथं आंदोलन केलं आहे.

  • Share this:

पुणे, 7 सप्टेंबर : राज्यातील जवळपास 25 गडकिल्ले लग्नसोहळ्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकारवर चौफेर टीका झाली. त्यानंतर आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शनिवारवाडा इथं आंदोलन केलं आहे. 'शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने दिले जाणार असतील तर आधी शनिवारवाडा भाडेतत्त्वावर द्या,' असं म्हणत राष्ट्रवादीने आंदोलन केलं आहे.

'शनिवारवाड्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलांचं बारसं, मुंजही करावी,' अशी बोचरी टीका आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे आणि प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.

दरम्यान, राज्यातील गडकिल्ले महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून भाड्याने देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल उभारणी करण्यात येणार असून करारावर हॉटेल व्यावसायिकांना किल्ले देण्यात येणार आहे. अशा 25 किल्ल्यांची यादी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून काढण्यात आली आहे. याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसमधून प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्यांनी म्हटलं आहे की, शिवरायांच्या इतिहासाशी खेळ करण्याचा आणि शिवरायांचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न कायम आहे. आधी शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी केली आणि आता शिवरायांचे गडकिल्ले हॉटेल्स आणि लग्नस्थळ म्हणून उद्योगपतींना आंदण देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 60 ते 90 वर्षांच्या भाडेकरराने हे गडकिल्ले खासगी उद्योगांना दिले जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हि उद्योगपतींना दिलेले भेटच आहे. गडकिल्ले हे शिवरायांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहेत, भाजपा सरकारने महाराष्ट्राच्या अस्मितेशी सुरू केलेला खेळ थांबवावा असंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारकडून खुलासा

राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. या सगळ्या बातम्या अफवा असून वर्ग १ चे किल्ले शिवाजी महाराजांचे असून त्यांच्याबद्दल भाडेतत्त्वावर देण्याचा कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचं पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं आहे.

VIDEO: मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांकडून टाळ्या वाजवून घेतल्या, युतीवरून उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

First published: September 7, 2019, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading