ठाणे मनपा विरोधात राष्ट्रवादीचं ठिय्या आंदोलन, आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा सहभाग

ठाणे मनपा विरोधात राष्ट्रवादीचं ठिय्या आंदोलन, आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा सहभाग

कोरोना रूग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेड उपलब्ध होत नसल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. या विरोधात महापालिका मुख्यालयाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

  • Share this:

ठाणे, 20 एप्रिल : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं मंगळवारी पाहायला मिळालं. महानगर पालिका परिसरात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा आंदोलनात सहभाग होता. विशेष म्हणजे मनसेनंही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

(वाचा-अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण, लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल)

ठाणे महानगर पालिका हद्दीमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली असून कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. कोरोना रूग्णांना ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि बेड उपलब्ध होत नसल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. या विरोधात महापालिका मुख्यालयाच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांच्यासह, विरोधी पक्षनेता शानू पठाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी आंदोलकांनी रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ठिय्या आंदोलन केलं.

(वाचा - अरविंद केजरीवाल यांच्या पत्नीला कोरोनाची लागणी, मुख्यमंत्री देखील क्वारंटाइन)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आंदोलनाला मनसेनंही पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. मनसे ठाणे-पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव देखील मनसे कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका यंत्रणा सक्षम नसून पालिका आयुक्त, आरोग्य अधिकारी कॉल घेत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.

संपूर्ण राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. ठाणे महानगर पालिका हद्दीतही गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी याठिकाणी पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. तर एका दिवसांत 40 हून अधिक कोरोना रुग्णांनी प्राण गमावले. स्थानिक मनपा प्रशासन कोरोनाच्या स्थितीला योग्य पद्धतीनं हाताळत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसनं मंगळवारी हे आंदोलन केलं.

Published by: News18 Desk
First published: April 20, 2021, 4:31 PM IST

ताज्या बातम्या