नवी मुंबई, 29 डिसेंबर : कोरोना व्हायरसमुळे लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात झाली आहे. कारण भाजप नेते गणेश नाईक यांच्या गडाला सुरुंग लावत 3 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. नवीन गवते, अपर्णा गवते, दिपा गवते अशी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा 3 नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने भाजपला खिंडार पडल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या तीनही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
गणेश नाईकांच्या वर्चस्वाला धक्का बसणार?
नवी मुंबई महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईक यांचं एकहाती वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाईक यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी नाईक यांच्यासह राष्ट्रवादीच्या बहुतांश नगरसेवकांनी भाजपमध्ये जाणं पसंत केलं.
गणेश नाईक भाजपमध्ये दाखल झाले खरे मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय आणि सत्तेची गणिते बदलून गेली. शिवसेनेनं भाजपला बाजूला सारत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आणि सत्ता काबीज केली. त्यामुळे आता नवी मुंबईतही चित्र पालटू लागलं आहे. गणेश नाईक यांच्यापासून दूर होत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत जाणं पसंत केलं आहे. तसंच ही महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष पूर्ण ताकदीने लढवणार आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांच्यासमोर बालेकिल्ल्यात मोठं आव्हान उभं राहिलं आहे.