'अजून मी 100 वेळा जाणार आहे', गणेश नाईकांनी डिवचल्यानंतर जितेंद्र आव्हाड भडकले

'अजून मी 100 वेळा जाणार आहे', गणेश नाईकांनी डिवचल्यानंतर जितेंद्र आव्हाड भडकले

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 9 मार्च : महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत राजकीय धुमशान सुरू झालं आहे. राष्ट्रवादी विरुद्ध गणेश नाईक यांच्यात चांगलेच आरोप-प्रत्यारोप रंगू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा गणेश नाईक यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केला आहे.

'मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरू केली. अजून तर मी 100 वेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे. नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा... छैया बघायला तयार राहा #गद्दार_गणेशनाईक,' असं ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं आहे.

गणेश नाईकांनी केली होती विखारी टीका

'माझ्यावर खंडणीखोर असल्याचा आरोप केला जात आहे. पण माझ्याविराधात आतापर्यंत एकही तक्रार दाखल नाही. मी जर खरंच खंडणीखोर आहे तर जा ना पुरावे घेऊन केस करायला...आता निवडणूक आल्यानंतर ज्यांची कुवत आहे तेही बोलतील ज्यांची कुवत नाही तेही बोलतील. एकच म्हणतो...यह तेरे बस की बात नहीं...जा अपने बाप को बुला....और नाम पुछा तो बोल गणेश नाईक,' असं म्हणत गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता.

'गणेश नाईक गद्दार आणि खंडणीखोर'

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी घृणा असलेल्या गणेश नाईकांना शेठजींच्या घरचं जेवण चालते पण कार्यकर्त्यांच्या घरचा पाणी चालत नाही. अशा गणेश नाईकांना 'कोरोना व्हायरस'चा ब्रँड Ambasider करा, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे. गणेश नाईक बाळासाहेबांचे होऊ शकले नाही तर शरद पवारांचे काय होणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

'गणेश नाईकांवर शरद पवारांचा प्रचंड विश्वास होता. नाईकांनी पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. नाईकांनी स्वतःच्या पोराचा राजकीय बळी घेतला. पोराच्या तिकीटावर स्वतः उभे राहिले. आमदार मंदा म्हात्रे, विजय चौगुले यांनी फक्त गणेश नाईकांमुळे राष्ट्रवादी सोडली,' असा आरोप आव्हाडांनी केला.

'सत्ता फिरली की गणेश नाईक फिरले. शरद पवारांचे ऑपरेशन सुरू असताना ते राष्ट्रवादी सोडायला निघाले. गणेश नाईकांनी एकाही कार्यकर्त्याला मोठं केलं नाही. त्यांनी स्वतः पैसे कमावले. नगरसेवकांना पगारावर ठेवलं. सर्व रेती आणि उद्योग धंद्यामधील नवी मुंबईतील खंडणी गणेश नाईक वसूल करतात,' असा घणाघाती आरोप जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील कार्यक्रमात केला होता.

First published: March 9, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading