नवी मुंबई, 13 एप्रिल : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य व्हावं, म्हणून केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस आणि प्रशासन जीवाचं रान करत आहेत. मात्र लोकप्रतिनिधीनेच नियमांची पायमल्ली केल्याचा प्रकार समोर आला आहे. जमावबंदी असतानाही नवी मुंबईतील भाजप नगरसेवक आपल्या मित्रांसह मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्याची घटना घडली आहे.
जमावबंदीतही मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते रवींद्र इथापे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. रवींद्र इथापे यांच्यासह 17 जणांवर सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना घरात बसण्याचं आवाहन केलं जात असताना लोकप्रतिनिधींनीच असं कृत्य केल्यामुळे टीका होत आहे.
दरम्यान, पनवेलमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता. भाजप नगरसेवकाने लॉकडाऊन असतानाही मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्याचं समोर आलं. भाजप नगरसेवक अजय बेहरा यांनी त्यांच्या 10 मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला. बर्थडे पार्टी करताना त्यांनी पोलिसांनी अटक केली होती.
नवी मुंबईत काय आहे कोरोनाची स्थिती?
महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये नवी मुंबईतही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच काल नवी मुंबईतील दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. ही स्थिती लक्षात घेत प्रशासनाने कडक निर्णय घेतले आहेत. नागरिक या निर्णयांना प्रतिसाद देत असताना लोकप्रतिनिधींकडूनच हरताळ फासला जात असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.