जळगाव, 14 नोव्हेंबर: 2015 साली जळगाव जिल्ह्यातील कोथळी येथील जलाशयात बुडणाऱ्या एका लहान मुलाला दहा वर्षांच्या मुलानं वाचवलं होतं. 10 वर्षाच्या मुलानं आपल्या जीवाची बाजी लावून संबंधित मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने संबंधित मुलाला एका रात्रीत राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. अनेक बड्या नेत्यांनी धुराळा उडवत संबंधित मुलाच्या घरी जाऊन त्याचं कौतुक केलं होतं. भारत सरकारनंही संबंधित मुलाला राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार (National Bravery Award) देऊन सन्मानित केलं होतं. अनेकांनी पुरस्कारासोबत आर्थिक मदतीची आश्वासनं दिली होती.
पण ही सर्व आश्वासनं फक्त कागदावरच उरली आहेत. प्रत्यक्षात मात्र संबंधित मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला फारशी मदत मिळाली नाही. प्रसिद्धीचा झगमगाट आणि आश्वासनानंतर संबंधित मुलाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा दारिद्र्याशी संघर्ष अद्याप सुरूच आहे. एकेकाळी बालशौर्य पुरस्कार जिंकून अनेकांसाठी कौतुकास पात्र ठरणारा हा मुलगा सध्या बकऱ्या चारून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. संबंधित मुलाचं नाव नीलेश भिल्ल (Nilesh Bhil) असून त्याला 2015 सालचा राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार (National Bravery Award-2015) मिळाला होता.
हेही वाचा- Children's Day: भारतात 20 ऐवजी 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?
जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावकुसाबाहेर आशापुरी देवीच्या मंदिरामागे रेवारं भिल्ल आणि त्याचं कुटुंब वास्तव्याला आहे. 30 ऑगस्ट 2015 साली कोथळी येथील मुक्ताई मंदिरासमोर जलाशयात भागवत उगले नावाचा एक मुलगा बुडत होता. या लहान मुलाला पाण्यात बुडताना नीलेशनं पाहिलं. यावेळी त्यानं कसलाही विचार न करता पाण्यात उडी घेतली आणि संबंधित मुलाला पाण्यातून बाहेर काढलं. 10 वर्षाच्या नीलेशनं वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने संबंधित मुलाचा जीव वाचवला होता. त्यामुळे नीलेशला 26 जानेवारी 2016 साली राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.
हेही वाचा- बाल पुरस्कार : महाराष्ट्राने मारली बाजी, PM मोदी सोमवारी साधणार संवाद
पुरस्कारानंतर कौतुकाचा वर्षाव आणि आश्वासनांची खैरात सुरू झाली. अनेक राजकीय नेत्यांनी आणि पुढाऱ्यांनी प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्या नीलेशची भेट घेऊन फोटो काढले. पण हे सर्व तेवढ्यापुरतंच मर्यादीत राहिलं. संबंधित कुटुंब अजूनही दारिद्र्याशी लढत आहे. त्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे साधं घरकुल देखील मिळालं नाही. त्याचे वडील पायाच्या विकाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे तो बकऱ्या चारून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत आहे. तर आई मजुरी करून संसाराला हातभार लावत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jalgaon