विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी
नाशिक, 20 मार्च : महाराष्ट्र राज्याच्या नुकताच सादर झालेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. 17 मार्च 2023 पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. हा निर्णय महिलांच्या हिताचा असल्याचे राज्य सरकारचं जरी मत असलं तरी मात्र यावर नाशिकमधील महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बसमध्ये तिकीट सूट देऊन आमचं काही भागणार नाही. महागाई वाढली आहे त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरमध्ये सूट द्या. सर्व सामान्य माणसाला घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करणं अवघड झालं आहे. अव्वाच्या सव्वा किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही काय करायचं असा प्रश्न नाशिकच्या महिलांनी उपस्थित केला आहे.
घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त करा
दिवसागणिक महागाईच्या झळा सर्व सामान्य नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे करायचं काय ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. सध्या बघितलं तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती वाढलेल्या आहेत. 50,100 रुपये सातत्याने वाढतच आहेत. त्यामुळे महिलांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. आम्हा महिलांना बसमध्ये सूट नको तर आम्हाला घरगुती गॅस सिलेंडरमध्ये सूट द्या. तेव्हा आमचा संसार चालेल अशी प्रतिक्रिया अश्विनी पुरी यांनी दिली आहे.
Onion Subsidy : सरकारी अनुदान म्हणजे थट्टा, शेतकऱ्यानं समजावलं कांद्याचं गणित, पाहा Video
महिला कुठे दररोज बसने फिरणार
राज्य सरकारने सर्वच महिलांसाठी हा निर्णय घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील महिला बसणे दररोज कुठे फिरणार आहेत? ग्रामीण भागातील महिला दोन वेळच अन्न शिजवण्यासाठी झगडत असतात. त्यांना जंगलातून लाकडं आणून अन्न शिजवाव लागतं. एकीकडे उज्वला गॅसचा कांगावा केला जातो आणि त्याच्या किंमती वाढून दिल्या आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर भरायला परवडत नाही. त्यामुळे लवकरात लवकर गॅसच्या किंमती कमी करून सर्व दिलासा सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी प्रतिक्रिया आरती बोराडे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.