नाशिक, 3 डिसेंबर : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार सांगूनही मोकाट कुत्र्यांना खायला देतात, या रागातून नाशिकमध्ये एका महिलेला आणि तिच्या मुलीला स्थानिक नगरसेविकेने आणि तिच्या पतीसह कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगासह परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुत्र्यांना खायला देतात म्हणून मारहाण
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या मुलीला शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका पुनम मोगरे आणि त्यांचे पती दिगंबर मोगरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने मारहाण केल्याचा आरोप आहे. परिसरातील भटक्या कुत्र्यांना पीडित महिला आणि तीची मुलगी खायला देत होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी कायमच कुत्र्यांचा वावर होता. कुत्रे या परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या अंगावर भुकांयचे. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगरसेविकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
पीडितेने घेतली चित्रा वाघ यांची भेट
या घटनेनंतर पीडित महिलेने आणि तिच्या मुलीने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप पीडित महिला आणि तिच्या मुलीकडून करण्यात आला आहे. दरम्यान आता या प्रकरणी या महिलेने आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांची भेट घेतली आहे. महिलांना मारहाण करणारे कोणीही असो कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आपण पोलीस आयुक्तांशी बोलून करू, अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली आहे.
हेही वाचा : राज्यातील सरकार कधी कोसळणार?; सुषमा अंधारेंनी सांगितली तारीख अन् महिना
स्थानिकांचा महिलेवर आरोप
मात्र दुसरीकडे नगरसेविका पुनम मोगरे आणि परिसरातील नागरिकांनी पीडित महिला आणि तिच्या मुलीवरच आरोप केले आहेत. सदर महिला आणि तिची मुलगी मोकाट कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालतात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे जमतात आणि हे कुत्रे परिसरातील येणाऱ्या लहान मुलांना महिलांना चावतात. या महिलेला आणि तिच्या मुलीला याबाबत अनेकदा कल्पना देऊनही ते कृत्र्यांना खाऊ घालत होते. तसेच याबाबत बोलण्यासाठी गेलेल्या नागरिकांशी त्या वाद घालत होत्या, असं पुनम मोगरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : जन्म झाला अन् 'ती'ला शौचालयाच्या बादलीत टाकलं; भयंकर घटनेनं बीड पुन्हा हादरलं
सीसीटीव्ही कॅमेरे काढल्याचा आरोप
कुत्र्यांवरून सुरू झालेला हा वाद हाणामारीपर्यंत गेल्याने पोलिसांनी याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे. मात्र मारहाण करणाऱ्या स्थानिक नगरसेविकेने या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआरही काढून नेल्याची तक्रार महिलेने केली आहे. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik