नाशिक, 24 नोव्हेंबर : नाशिकच्या गंगापूर रोड (Gangapur Road) परिसरात खोदकाम सुरु असताना कुतूहल निर्माण करणारा भुयारी मार्ग (Subway) सापडला आहे. आनंदीबाईं पेशवे (Anandibai Peshwe) यांच्या गढीच्या जागेत हा भुयारी मार्ग सापडल्याने या ऐतिहासिक ठेव्याच्या जतनाची जबाबदारी कुणाची? असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण सध्या ही जागा शहरातील राजकीय क्षेत्रातील काही बड्या लोकांसह बांधकाम व्यवसायिकांच्या मालकीची आहे.
नाशिकचा हाच तो भुयारी मार्ग, ज्याची चर्चा आता नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागलीय. ज्या जागेत हे भुयार सापडलं आहे ही जागा आनंदीबाई पेशवे यांच्या गढीची आहे. मात्र सध्या ही जागा शहरातील राजकीय क्षेत्रातील काही बड्या लोकांसह बांधकाम व्यवसायिकांच्या मालकीची आहे. यातीलच देवराम साठे नामक खाजगी विकासकाने या जागेवर हवेली नावाचा गृह प्रकल्प उभारणीस सुरुवात केलीय. मात्र या प्रकल्पाचा पाया खोदत असताना या ठिकाणी ऐतिहासिक भुयार सापडल्याने हा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे भुयार सापडल्यानंतर पुरातत्व विभागासह अभ्यासकांनी या ठिकाणाची पाहणी करत हे ऐतिहासिक भुयार आहे, या वृत्ताला दुजोरा दिला.
हेही वाचा : देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण
या ठिकाणी खोदकाम सुरु असताना सापडलेल्या या पेशवेकालीन भुयारात इतरही 3 ते 4 मार्ग असण्याचा अंदाज आहे. ज्या जागेवर गृहप्रकल्पा साठी खोदकाम केलं जातं आहे ती जागा सुरुवातीपासून वादात असून ही गढी वाचविण्यासाठी झालेल्या आंदोलनात एका स्थानिकाला आपला जीव देखील गमवावा लागल्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आज पुन्हा या ठिकाणी भुयार सापडल्याने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
ज्या ठिकाणी हे भुयार सापडले आहे आणि अद्यस्थीतीत ही जागा ज्यांच्या मालिकीची असल्याचा दावा करणारे बांधकाम व्यवसायिक देवराम साठे यांनी देखील ही जागा आनंदीबाई यांच्या गढीचीच असल्याची कबुली दिली आहे. त्यांनी सापडलेल भुयार हे पेशव्यांच्या काळात शत्रू पासून लहान मुलांना वाचविण्यासाठी बनविण्यात आल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. साठे यांच्या आगोदर या जागेचे 2 ते 3 मालक होऊन गेले आहेत. त्यांनी ही जागा खाजगी मिळत असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा ना हरकत दाखला, पुरातत्व विभागाचा ना हरकत दाखला घेऊनच आपण हे काम सुरु केल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा : एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि अनिल परबांमध्ये चर्चेची पहिली फेरी पूर्ण, चर्चेत काय ठरलं?
ज्या जागेत हे ऐतिहासिक भुयार सापडले आहे त्या आनंदी बाईंच्या गढीच्या जागेवर आजही नदीच्या आणि मंदिराच्या बाजूने दगडी पायऱ्या, दरवाजे, नदीच्या काठावर असनारे तट भुयारी मार्ग अशा जतन करण्यासारख्या ऐतिहासिक बाबी अस्तित्वात आहे. मात्र असा सगळा ऐतिहासिक ठेवा कायम असताना ही जागा खाजगी विकासकांच्या ताब्यात कशी गेली? असे प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागले आहेत.
गड किल्ल्यांवर एक भिंत बांधायला जो पुरातत्व विभाग शासनाच्याच विभागाला परवानगी देत नाही त्या पुरातत्व विभागाने या बांधकाम व्यवसायिकाला या जागेवर वारंवार इतक्या सगळ्या ऐतिहासिक पाऊलखुणा सापडत असताना ना हरकत दाखला कसा दिला? असा सवाल उपस्थित केला जातोय. शिवाय अशा ऐतिहासिक बाबी सापडल्यानंतर तातडीने अशा जागांवरचे काम थांबविण्याचे आदेश देणारे स्थानिक जिल्हा प्रशासन या प्रकरणाकडे का कानाडोळा करतंय? हा देखील सवाल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.