नाशिक, 16 जानेवारी : नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. अशातच अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्या आहेत. त्यांच्याशी कुणाचाही संपर्क होत नाही. पाटील या अचानक गायब झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
(हिम्मत असेल तर 'त्यांनी' मुश्रीफांचे..., आता सोमय्यांचे थेट शरद पवारांना आव्हान)
दोनच दिवसांपूर्वी शुभांगी पाटील यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेनं पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
अशातच आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. बैठकीत अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील सहीत अनेक नेते उपस्थित होते. नाशिक विधान परिषद मतदार संघ निवडणुकीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्ष लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
(MLC election :..आणि 'डॉ.सुधीर तांबे' यांनी अर्ज घेतला मागे, नाशिक विधान परिषद निवडणुकीला नवे वळण)
तर दुसरीकडे, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ.सुधीर तांबे यांच्या नावाने डमी उमेदवार असलेले डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. एकच सारखे नाव असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण डॉ सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता. डमी उमेदवार असलेले सुधीर तांबे हे मूळचे पनवेल येथील आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांची देखील माघार घेतली आहे. 22 उमेदवारांपैकी आतापर्यंत 2 जणानी माघार घेतली आहे.
अपक्ष उमेदवार धनराज विसपुतेंनी घेतली फडणवीसांची भेट
तर, नाशिक पदवीधर मतदार संघ पाठिंबासाठी अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. नागपूर येथे ही भेट झाली. त्यांना नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ २०२३ निवडणुकीमध्ये मला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा मिळावा यासाठी विनंती केली आहे. जवळ जावळ १ तास त्यांनी मला वेळ दिला व माझे संपूर्ण नियोजन समजून घेतले. यानंतर पक्षाची भूमिका काय असेल हे फडणवीस पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहेत. त्यानुसार आमची पुढची वाटचाल आम्ही ठरवणार आहे, असं विसपुते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.