नाशिक, 3 फेब्रुवारी : नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजित तांबे हे विजयी होणार का? याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून, सत्यजित तांबे हे विजयी झाले आहेत. विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले तांबे?
नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांनी बाजी मारली आहे. त्यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. विजयानंतर सत्यजित तांबे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली. डॉ. सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता माझ्याकडून देखील अशीच सेवा होईल असं सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : MLC Election : नागपूरपाठोपाठ औरंगाबादमध्येही भाजपला 'मविआ'चा धक्का; विक्रम काळे विजयी
दरम्यान सत्यजित तांबे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली होती. भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मात्र या निवडणुकीत भाजपने कुठलीही अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांचा निवडणुकीवेळी प्रचार देखील केला. त्यामुळे आता निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे हे भाजपला पाठिंबा देणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबाबत येत्या चार तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी मला पाठबळ दिल्याचंही यावेळी सत्यजित तांबे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.