नाशिक, 06 मार्च : कांद्याला कवडीमोल किंमत मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. कांद्याची विक्री केल्यानंतर अगदी दहा ते १०० रुपये इतके पैसे हातात येत असल्यानं शेतकरी हवालदील झाले आहेत. आता नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शेतातच कांद्याची होळी करून संताप व्यक्त केला आहे.
येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी कांद्याची होळी करत राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असताना सरकार मात्र फक्त घोषणांचा पाऊस पाडत असल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले. बाजार समितीत येऊन नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाईल असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले. मात्र आठवडा उलटून गेला तरी नाफेडची खरेदी सुरू झाली नाहीय. कांद्यातून फायदा मिळणे तर दूरच पण पीक लागवड आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
कांदा प्रश्नी न्याय मागायला गेलेल्या शेतकऱ्यांनाचं मंत्री भारती पवारांनी सुनावलं LIVE VIDEO
शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा सांगताना म्हटलं की, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलंय. केंद्र सरकार, राज्य सरकार हे सत्तासंघर्षात मश्गूल आहेत. शेतकरी जगतोय की मरतोय याकडे सरकारचं लक्ष नाही. शेतकऱ्यांचं जगणं सरकारला मान्य नाही.
रात्र दिवस एक करून कांदा पिकवला. महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी काळा दिवस आहे. स्वत:च्या हाताने पिकवलेला कांदा एका शेतकऱ्याला केंद्राच्या आणि राज्याच्या आडमुठ्या धोरणामुळे जाळावा लागत आहे असा आरोपही त्यांनी सरकारवर केलाय. शेतकऱ्यांनी जवळपास दीड एकरातील कांदा पीक जाळत सरकारच्या नावाने बोंब मारली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.