नाशिक, 16 जानेवारी : नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या सकाळपासून अचानक गायब झाल्यामुळे खळबळ उडाली होती. अखेर शुभांगी पाटील या समोर आल्या आहेत. 'मी माझ्या उमेदवारी ठाम असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापले आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्यामुळे गोंधळ उडाला. अखेर अर्ज मागे घेण्याचा वेळ संपल्यानंतर दुसऱ्या कारने शुभांगी पाटील या विभागीय आयुक्त कार्यालयात आल्या.
'मी माझ्या उमेदवारी ठाम होते, ठाम आहे. मी कुठेही गेली नव्हते. मला ठाकरे गटाचा पाठिंबा आहे. मी अनेक शिक्षक संघटनांशी चर्चा केली आहे. ते मला पाठिंबा देतील. पेन्शन योजना असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल, यासाठी मी निवडणुकीला उभी आहे, सर्व संघटना मला पाठिंबा देतील असा विश्वास आहे, असं शुभांगी पाटील यांनी ठणकावून सांगितलं.
'सत्यजीत तांबे यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. काँग्रेस काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. पण, मला महाविकास आघाडीवर पूर्ण विश्वास आहे, ते मला पाठिंबा देतील, असंही पाटील म्हणाल्या.
'मी अपक्ष उमेदवार असल्यामुळे मला कुणीही संपर्क केला नाही. गिरीश महाजन यांनी संपर्क केला की नाही, त्यावर मी बोललेलं बरं नाही, असंही पाटील म्हणाल्या.
(हिम्मत असेल तर 'त्यांनी' मुश्रीफांचे..., आता सोमय्यांचे थेट शरद पवारांना आव्हान)
दरम्यान, आज महाविकास आघाडीची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. बैठकीत अजित पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील सहीत अनेक नेते उपस्थित होते. नाशिक विधान परिषद मतदार संघ निवडणुकीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्ष लवकरच याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
(MLC election :..आणि 'डॉ.सुधीर तांबे' यांनी अर्ज घेतला मागे, नाशिक विधान परिषद निवडणुकीला नवे वळण)
तर दुसरीकडे, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ.सुधीर तांबे यांच्या नावाने डमी उमेदवार असलेले डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ.सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. एकच सारखे नाव असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण डॉ सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता. डमी उमेदवार असलेले सुधीर तांबे हे मूळचे पनवेल येथील आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांची देखील माघार घेतली आहे. त्यापाठोपाठ विसपुते यांनीही अर्ज मागे घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.