नाशिक, 19 जानेवारी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांना नगरपंचायत निवडणुकीत चांगलाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे भारती पवार यांना त्यांच्या दिंडोरी येथील मतदारसंघातच पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यानंतर कळवण नगरपंचायतीतही भारती पवार यांच्या नेतृत्वाला अपयश येताना दिसलं. भारती पवार यांचे दीर आमदार नितीन पवार यांनी राष्ट्रवादीला बळ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 17 पैकी 9 जागांवर विजय मिळाला. तर भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. हा खासदार भारती पवार यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
कळवण नगरपंचायत निकाल
एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 09
भाजप – 02
काँग्रेस – 03
शिवसेना – 02
मनसे – 01
भारती पवार यांना दिंडोरीतही मोठा धक्का
दिंडोरीत केंद्रिय मंत्री डॉ. भारती पवार यांना जोरदार धक्का बसला आहे. या ठिकाणी 17 पैकी 6 जागा मिळवून शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे दिंडोरी हा भारती पवारांचा मतदारसंघ आहे. दिंडोरी नगरपंचायतीची निवडणूक डॉ. भारती पवार यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्या मतदारसंघातही तळ ठोकून होत्या. दिंडोरी हा भारती पवार यांचा मतदारसंघ आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी भागात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती.
(भाजप पहिला क्रमांकाचा पक्ष, तरीही महाविकास आघाडीचा निर्विवाद डंका)
दिंडोरी नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा आहेत. त्यापैकी सहा जागा शिवसेनेने पटकावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा पटकावल्या आहेत, तर भाजपला चार आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीही एकत्र आले, तर नगरपंचायत त्यांच्या ताब्यात राहू शकते. विशेष म्हणजे मोदी लाटेत निवडून येणार्या पवार यांना नगरपंचायत निवडणुकीत धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दिंडोरी नगरपंचायत निकाल
एकूण जागा – 17
राष्ट्रवादी – 05
शिवसेना – 06
काँग्रेस – 02
भाजपा – 04
दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीत सुरगाणा आणि देवळा नगरपंचायतीवर भाजपचे कमळ फुलले तर निफाडमध्ये 17 पैकी 7 जागा मिळवून शिवसेना नंबर वनचा पक्ष ठरला. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीची सत्ता येऊ शकते.
नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायत एकूण जागा 102
पक्षीय बलाबल
भाजप-30
शिवसेना-25
राष्ट्रवादी-28
काँग्रेस-06
माकप-05
मनसे-01
बसप-01
निफाड शहर विकास आघडी- 4
अपक्ष- 2
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.