नाशिक, 10 जून : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शुक्रवार (9 जून) पासून पावसाने हजेरी लावली आहे. काल मुंबईसह उपनगर आणि कोकणातील काही भागात तुफान वाऱ्यासह पावसाची रिपरिप नागरिकांनी अनुभवली. यानंतर आज पुणे-नाशकात (Nashik Rain) पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
सध्या नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावल्यामुळे नाशिककर आनंद घेत आहेत. कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी पहिल्याच पावसाने शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
पहिल्याच पावसात अशी अवस्था असेल तर पावसाचे चार महिने कसे जाणार असा सवाल नागरिकांसमोर आ वासून उभा आहे.
मागच्या कित्येक दिवसापासून मान्सूनच्या आगमनाची (Monsoon Update) प्रतिक्षा लागून राहिली होती ती अखेर आज (दि.10) संपली. तळकोकणातून मान्सूनचा (Konkan monsoon rain) महाराष्ट्रातील प्रवास सुरू झाला आहे. याबाबत खात्रीलायक माहिती हवामान विभागाकडून (imd alert monsoon) देण्यात आली आहे. मान्सून महाराष्ट्रातील किनारी भागात पोहचला असून कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान झाल्यानं राज्यात पूर्वमोसमी पावसानं काल अनेक ठिकाणी हजेरी लावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.