लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी
नाशिक, 16 मे : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाला आहे. गौतमीच्या नाशिकमधल्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे. या तरुणांनी पत्रकारांना मारहाणही केली आहे. गौतमी पाटीलचा डान्स दिसत नसल्यामुळे तरुणांनी पत्रकारांना खुर्च्यांनी मारहाण केली, यामध्ये मीडियाच्या अनेक कॅमेरांचंही नुकसान झालं आहे. दम्यान नाशिक पोलीस गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यात दंग होते.
गौतमी पाटील हिचा नाशिकमध्ये डान्सचा कार्यक्रम होता, पण या कार्यक्रमाला नाशिककरांनी पाठ फिरवल्याचं चित्र बोतं. गौतमीच्या कार्यक्रमात निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. नाशिक शहरामध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा, हुल्लडबाज तरुणांकडून पत्रकारांना मारहाण#GautamiPatil pic.twitter.com/hQt5PEZsiK
— News18Lokmat (@News18lokmat) May 16, 2023
बार्शीमध्ये तक्रार दाखल
दरम्यान बार्शी येथे गौतम पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणे आयोजकांना चांगलेच महागत पडले. आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्यावर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी पाटील हिने आपली फसवणूक केल्याची तक्रार बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यावर आता गौतमी पाटील हिने तक्रार दिली आहे.
12 मे रोजी बार्शी येथे राजेंद्र गायकवाड यांनी गौतम पाटील हिचा लावणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, गौतम पाटील हिचा कार्यक्रम उशिरा सुरू झाला. पोलिसांनी रात्री दहा वाजता वेळेची मर्यादा ओलांडल्यामुळे गौतम पाटीलचा कार्यक्रम पोलिसांनी बंद पडला. मात्र, आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी कोणतीही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतली नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच लेखी कळवूनही गौतमी पाटील हिचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजक राजेंद्र गायकवाड यांच्या विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तर आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी गौतमी पाटील विरोधात फसवणुकीची बार्शीत पोलिसात तक्रारी अर्ज दाखल केला. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रारी अर्ज दाखल केला आहे. फसवणूक करून मला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गायकवाड यांनी तक्रार दिली. गौतमी पाटील 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gautami Patil