नाशिक, 25 जानेवारी : क्रिकेट खेळत असतानाच तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या कॉलेज रोड भागामध्ये हा प्रकार झालाय. आकाश रवींद्र वाटेकर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. क्रिकेट खेळत असताना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
क्रिकेट खेळत असतानाच त्याला हार्ट अटॅक आला ज्यामध्ये आकाशला जीव गमवावा लागला, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आकाशच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याचे मित्र आणि कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आकाश मंगळवारी संध्याकाळी एलबीटी लॉ कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट खेळत होता, तेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागलं, याप्रकरणी अकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती गंगापूर पोलिसांनी दिली आहे. आकाश लॉ च्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी होता.
अस्वस्थ वाटू लागल्यानंतर आकाशच्या मित्रांनी त्याला जवळच्या मेडिकल स्टोअरमधून गोळी आणून दिली. गोळी घेतल्यानंतर त्याने थोडावेळ आराम केला. बरं वाटल्यानंतर त्याने पुन्हा खेळायला सुरूवात केली. बॉलिंग करत असताना आकाशच्या हृदयात कळ आली आणि तो मैदानातच कोसळला, यानंतर मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.