नाशिक, 23 नोव्हेंबर : जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu ) यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) कार्यालयात धाड (Raid) टाकत अधिकाऱ्यांना जाब विचारले. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. बच्चू कडू हे प्रचंड शिस्तप्रिय आहेत. सर्वसामान्यांसाठी सरकारडून लागू करण्यात आलेल्या लोककल्याणाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी बच्चू कडू यांनी राज्यमंत्री असण्यापूर्वीदेखील त्यांच्या प्रहार (Prahar) संघटनेमार्फत खूप काम केलं आहे. त्यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून अनेक बेशिस्त आणि कामचुकार अधिकाऱ्यांना अद्दल घडवली आहे. बच्चू कडू त्यांच्या या आक्रमक कार्यपद्धत आणि समाज कल्याणासाठी असलेली त्यांची पोटतिडकी यामुळे ते लोकप्रिय आहेत. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागात धाड टाकून पुन्हा त्यांच्या स्टाईलच्या कार्यपद्धतीची आठवण करुन दिली आहे.
जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज जलसंपदा विभागात धाड टाकली. बच्चू कडू यांनी अचानक टाकलेल्या या धाडीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे बच्चू कडूंनी जेव्हा धाड टाकली त्यावेळी मुख्य अभियंच्यासह कार्यकारी अभियंता कार्यालयात गैरहजर होते. यावेळी कार्यालयीन कामकाजात अनियनितता आढळल्याने बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची चांगलाच घाम फुटला.
हेही वाचा : परमबीर सिंग 'फरार', जुहूतल्या फ्लॅटच्या दरवाज्यावर कोर्टाची ऑर्डर
बच्चू कडू यांनी कार्यालयीन कामजात अनियमितता असल्याचं निदर्शनास आल्यानंतर दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता चव्हाण आणि कार्यकारी अभियंता भोम्बरे यांची दोन दिवसांचा पगार कपात केला आहे. बच्चू कडूंच्या या झाडाझडतीत जलसंपदा विभागाचा भोंगळ आणि संशयास्पद कारभार चव्हाट्यावर आला आहे. कामांच्या, हजेरीच्या निट नोंदी ठेवल्या जात नसल्याचे उघड झालं. तसेच यावेळी बच्चू कडू यांनी अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्या कामावरही नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा : महाविकास आघाडीकडून भाजपला धोबीपछाड, सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर वर्चस्व
बच्चू कडू यांचे कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचे असे अनेक किस्से आहेत. त्यापैकी लक्षात राहिल असा किस्सा. बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते त्यांच्या स्टाईलने कामाला लागले होते. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बच्चू कडू यांनी दोन नायब तहसीलदारांवर कारवाई केली होती. बच्चू कडू यांनी दोन्ही नायब तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई केली होती.
सर्वसामान्यांच्या फाईली अधिकाऱ्यांकडून दाबल्या गेल्या तर त्या अधिकाऱ्याची सर्व्हिस थांबेल, अशी तंबी बच्चू कडू यांनी दिली होती. सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या बैठकीत बच्चू कडूंनी कामात कसूर सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.