मालेगाव, 26 फेब्रुवारी : गोळीबार सारख्या गंभीर गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या माजी महापौराची कोर्टाने जामिनावर सुटका केल्यानंतर त्याची मिरवणूक काढून जंगी स्वागत (welcome rally) करण्यात आल्याची धक्कादायक घटना मालेगावात (Malegaon) घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एका आरोपीचे ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले ते पाहून हे राजकीय उदात्तीकरण आहे की उन्माद असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मालेगावच्या म्हाळदे शिवारात सुमारे दीड महिन्यांपूर्वी 8 जानेवारीला जमीन कब्जा वादातून गोळीबाराचा प्रकार घडला होता. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर या गुन्ह्यात माजी महापौर अब्दुल मलिक (Former Mayor Abdul Malik) यांच्यासह इतर काही संशयित आरोपी विरुद्ध पवारवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तेव्हापासून मलिकसह इतर आरोपी नाशिकच्या कारागृहात (Nashik Jail) होते.
वाचा : आधी सोशल मीडियात मैत्री मग वाढदिवसाच्या पार्टीचं आमंत्रण, नंतर दारू पाजून शिक्षिकेवर बलात्कार
जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता त्याच्यावर सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने त्यांना जमीन मंजूर केला. जमीन मंजूर झाल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली. मलिक यांना जमीन मिळाल्याचे कळताच त्यांच्या शेकडो समर्थकांनी नाशिकच्या सेंट्रल जेलच्या बाहेर धाव घेतली.
मलिक कारागृहातून बाहेर पडताच कार्यकर्त्यानी एकच जल्लोष केला. दुपारी त्यांचे मालेगावात आगमन झाल्यावर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांची गिरणा पुलापासून जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते. मिरवणुकीची माहिती मिळताच पोलिसांनी देखील बघ्याची भूमिका न घेता अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी किल्ला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा आदेश दिला.
वाचा : जळगावात तमाशा कलावंत तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; भरबाजारात केला हृदयद्रावक शेवट
त्यानुसार पोलिसांनी जिल्हाधिकारी आणि जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, विना परवानगी मिरवणूक काढणे यासह इतर कलमनाव्ये गुन्हा दाखल केला आहे. गोळीबार सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात जामीन मिळालेल्या आरोपीचे या पद्धतीने स्वागत केले जात असेल तर समाज कुठे चालला याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.