जळगाव, 20 मार्च : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 240 जागा तर शिवसेनेला 48 जागा असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांकडून या वक्त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते, मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सत्तेकरता नाही, तर सत्ता आमच्याकरता जन्माला आली आहे. बावनकुळे यांनी म्हटलं म्हणजे झालं असं होत नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
जागा वाटपाबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये निर्णय होईल त्यामुळे बावनकुळे यांनी म्हटलं म्हणजे झालं असं होत नाही. विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीला दीड वर्षाचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे आतापासूनच या चर्चा करण्याला अर्थ नसल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान अशा वक्तव्यामुळे शिवसैनिकांचे मनोबल कमी होत असल्याच्या चर्चेलाही गुलाबराव पाटलांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. आम्ही सत्ते करता नव्हे तर सत्ता आमच्याकरता जन्माला आली असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
दरम्यान दुसरीकडे बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही विधानसभेच्या 288 तर लोकसभेच्या 48 जागांसाठी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेला किती जागा मिळणार यावर आताच चर्चा करण्याची गरज नाहीये. आमच्या तयारीचा त्यांना फायदा होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil