नाशिक, ०1 फेब्रुवारी : जगभरात प्रख्यात असलेली नाशिकची गोदामाई सद्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. तिला मोकळा श्वास घेता येत नाही अशी परिस्थिती तिची झाली आहे. नाशिक महापालिका वारंवार गोदावरी स्वच्छ केल्याचा दावा करत आहे. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. कंपन्यांच्या केमिकलयुक्त दूषित पाण्याने गोदावरीची दयनीय अवस्था झाली आहे. ओढा गाव परिसरात तर गोदावरीच्या किनारी सुद्धा उभं राहू शकत नाही अशी स्थिती आहे. पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. या पाण्याचा शेतीवर देखील परिणाम होत आहे. पण प्रशासन सुस्त आहे. काहीही देणं घेणं नसल्यासारखं प्रशासन वागत असल्याचा गंभीर आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा स्वच्छतेचा नारा दिला आहे. तसेच देशातील सर्वच नद्या स्वच्छ आणि निर्मळ झाल्या पाहिजे अस त्यांचं मत आहे. मात्र, दरवर्षी शेकडो रुपये खर्च करूनही नाशिकची गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. मलनित्सरण केंद्र फक्त नावाला आहेत का ? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गावांना प्रदूषणाच्या धोका
गोदावरीच्या उगम स्थळापासून किनारी वस्ती आहे. रहिवासी परिसर आहे. त्यामुळे या प्रदूषणाचा नागरिकांना त्रास होतो. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे रोगराई देखील वाढण्याची शक्यता आहे. ओढा गाव परिसरात पाण्याच्या दुर्गंधीमुळे रहिवाशांना त्रास होत आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही अशी स्थिती आहे. तसेच या पाण्याचा शेतीवर देखील परिणाम होत आहे. पाण्यात क्षार उतरल्याने पीक व्यवस्थित येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काय करायचं ? अनेक वेळा पाठपुरावा करून ही प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. मात्र, अस न करता तात्काळ या दूषित पाण्याचा बंदोबस्त नाशिक महापालिकेने करावा अशी मागणी ओढा गावच्या सरपंच प्रिया पेखळे यांनी केली आहे.
संबंधितांवर कारवाई करणार
गोदावरी स्वच्छ करण्यासाठी आम्ही काटेकोरपने प्रयत्न करत आहोत. मात्र, काही कंपन्यांचे दूषित पाणी नासर्डी नदीत सोडले जात असल्याची माहिती आहे. त्यासंदर्भात चौकशी करून आम्ही कारवाई करणार आहोत. या अगोदर ही सूचना दिल्या असल्याची माहिती महापालिका उपायुक्त विजयकुमार मुंढे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.