नाशिक, 16 जानेवारी : विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहे
विधान परिषदेसाठीचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी थेट गिरीश महाजन मैदानात आले आहे. महाजन यांचा कोणताही अधिकृत दौरा नाही. पण महाजन हे नाशिकमध्ये अज्ञातस्थळी मुक्कामी आहे. नाशिकमध्ये येऊन महाजन पदवीधर निवडणुकीचे सूत्र हलवणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील असा मुकाबला रंगला आहे.
(मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार बॅटिंग, पण सुरक्षारक्षक थोडक्यात बचावला,VIDEO)
दरम्यान, नाशिकमध्ये शिवसेनेनं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूरची जागा काँग्रेसला दिली जाण्याची शक्यता आहे. नागपूरच्या जागेवरचा दावा शिवसेना मागे घेणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडे नागपूरची जागा जाणार आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. काँग्रेस सुधाकर अडबाले यांना समर्थन देणार की राजेंद्र झाडे यांना हे अद्याप अस्पष्ट झाले नाही. रविवारी रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरनसद्वारे चर्चेत निर्णय घेण्यात आला आहे. आज 11 वाजता पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे नेते चर्चा करून करणार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
( शरद पवारांना 'महाराष्ट्र केसरी'चं निमंत्रण का नाही? सुप्रिया सुळे म्हणतात..)
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज न भरल्यानं सुधीर तांबेंविरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारला आहे. काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबेंचं निलंबन करण्यात आलं आहे. उमेदवारी देऊनही सुधीर तांबेंनी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांच्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील. त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केलं आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निलंबनाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girish mahajan