हरिष दिमोटे, प्रतिनिधी
शिर्डी, 31 मार्च : आपल्या लाडक्या साईंच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. मुंबईतील साई भक्तांची पालखी शिर्डीत आली होती. पण, यावेळी गेटवर सुरक्षारक्षक आणि साई भक्तांमध्ये क्षुल्लक कारणावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शिर्डीत साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि साईभक्तांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. साईमंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक पाचच्या बाहेर ही घटना घडली आहे.
शिर्डीत साई संस्थानचे सुरक्षारक्षक आणि साईभक्तांमध्ये हाणामारी pic.twitter.com/BqdEooU3rg
— News18Lokmat (@News18lokmat) March 31, 2023
मुंबईहून पायी पालखी घेऊन आलेले भाविक पाच नंबर एक्झिट गेटने बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांचे काही तरी सामान मंदिर परिसरात राहिल्याचं लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा माघारी गेटमधून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना जाण्यास मज्जाव केला.
आमचं साहित्य आत राहिलं आहे, ते घेऊ द्या म्हणून त्यांनी मागणी केली पण त्यावरून सुरक्षारक्षक आणि साई भक्तांमध्ये वाद झाला. हा वाद नंतर विकोपाला गेला. त्यातून शाब्दिक वादावादी आणि नंतर हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी साईभक्तांना बेदम मारहाण केली. तर साईभक्तांनीही सुरक्षारक्षकाला चोप दिला. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी साईबाबा संस्थानकडून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला जात आहे. सुरक्षारक्षकाने भक्तांना मारहाण केल्याने साईभक्तांच्या सुरक्षेसाठी हे रक्षक आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भक्ताच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा शिर्डी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
(3 मुलींचे होतं लग्न, एक दिवस आधी घरात 20 लाखांची चोरी, घटनेने मोठी खळबळ)
शिर्डीत भक्तांना मारहाणीची ही काय पहिली वेळ नाही.. अनेकदा साईभक्तांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. देश-विदेशातील साईभक्त शिर्डीत आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्याशी आदराने आणि विनम्रपणे बोलायला हवे मात्र शिर्डीत चित्र उलटे आहे. भक्तांशी उद्धटपणे बोलल्याने अनेकदा असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गरज आहे साईबाबा संस्थानने आपल्या कर्मचाऱ्यांना विनम्रता शिकवण्याची...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shirdi