नाशिक, 20 जानेवारी : विद्यार्थ्यांची जडण घडण जर कुठून होत असेल तर ते म्हणजे अंगणवाडी. मात्र, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील अस्वली गावातील विद्यार्थी 5 वर्षांपासून अंगणवाडीच्या प्रतीक्षेत आहेत. गावात अंगणवाडी नसल्यामुळे गावातील लहान विद्यार्थी मारुती मंदिरात अंगणवाडी भरवतात. काही दिवसांपूर्वी अंगणवाडीच काम सुरू केलं मात्र पुन्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे काम तसच अर्धवट राहिलं आणि त्या ठिकाणी झाड झुडपं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ण करून लवकरात लवकर अंगणवाडी सुरु करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
अंगणवाडीच नसेल तर गावातील मुलं कशी घडतील
गावात एक ही सुविधा पुरेशी नाहीये. मात्र, अंगणवाडीचा मुद्दा हा महत्वाचा आहे. आम्ही मागील 5 वर्षांपासून अंगणवाडीच्या प्रतीक्षेत आहोत. आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच काम प्रशासन करत आहे. वेळोवेळी प्रशासनाकडे त्या संदर्भात पाठपुरावा केला. मात्र, ना त्याकडे अधिकारी लक्ष देतात, ना लोकप्रतिनिधी त्यामुळे जर अंगणवाडीच नसेल तर गावातील मुलं कशी घडतील. त्यामुळे अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ण करून लवकरात लवकर अंगणवाडी प्रशासनाने सुरु करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक राजेश कडू यांनी केली आहे.
लवकरच अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण होईल
महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे यांना या अंगणवाडी संदर्भात विचारणा केली असता त्यांनी लवकरच काम पूर्ण होईल आम्ही त्यासंदर्भात पाठपुरावा करत आहोत असं सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.