विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी
नाशिक 9 मार्च : अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असं म्हटलं जातं. मात्र, अद्यापही अवयवदानाची जनजागृती व्यापक स्वरूपात समाजात होत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा अवयवदान करण्यास नागरिक पुढे येत नाहीत. परंतु नाशिकचे डॉ. उदय साकुरीकर गेल्या अनेक वर्षांपासून 'मरावे परी अवयवरूपी उरावे' हा संदेश घेऊन आपल्या कनकलता प्रतिष्ठान अंतर्गत अवयवदान चळवळ चालवत आहेत. आतापर्यंत त्यांनी खेडोपाडी ही चळवळ पोहचवत जवळपास हजाराहून अधिक नागरिकांना नवदृष्टी देण्याचं काम केलं आहे.
जनजागृतीचे काम
नाशिक जिल्ह्यात आजच्या घडीला 500 नागरिक हे डोळ्यांच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु अद्यापही त्यांना नवंदृष्टी मिळत नाही. यासाठी सध्या डॉ. उदय साकुरिकर जनजागृतीचे काम करत आहेत. स्वतः जनरल डॉक्टर असतानाही त्यांनी नेत्र प्रशिक्षण घेऊन ते जिथे लोक नेत्रदान करण्यास उत्सुक आहेत. अशा ठिकाणी जाऊन स्वतः कॉर्निया हा डोळ्यातील भाग अलगद काढून तो दुसऱ्या व्यक्तीला उपयोगी ठरेल अशा पद्धतीने काम करत आहेत. आपल्याकडे अवयवदान ही मोहीम अधिक व्यापक होण्याची गरज आहे. साऊथमध्ये याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. तितकासा आपल्याकडे झालेला नाही. त्यामुळे ते विविध संघटनांच्या माध्यमातून ही चळवळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
नेत्र प्रशिक्षण घेण्याची गरज
साऊथच्या धरतीवर आपल्याकडे देखील जनरल डॉक्टरने या मोहिमेत सहभागी होणे गरजेचे आहे. कारण फॅमिली डॉक्टर जर या मोहिमेत सहभागी झाले तर सहा तासाच्या आत नेत्र काढू शकतात. आणि त्याचा उपयोग इतरांना होऊ शकतो. त्यामुळे जर कोणाला जनरल डॉक्टरला नेत्र प्रशिक्षण घ्यायच असेल तर कनकलता प्रतिष्ठान तर्फे अधिकृत प्रशिक्षण दिले जाईल. त्याचे सर्टिफिकेट देखील दिले जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त फॅमिली डॉक्टर यात सहभागी झाले तर अवयवदान जनजागृती लवकर होईल. या मोहिमेत जास्तीत जास्त तरुणांनी देखील सहभागी होणं गरजेचं असल्याचं डॉ.उदय साकुरीकर यांनी सांगितले.
Women's Day 2023: चक्क जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरली आनंदनगरी! पाहा कशी केली सर्वांनी धमाल, Video
फॉर्म भरणे म्हणजे अवयवदान नाही
अनेक जण अवयव दानाचा फॉर्म भरतात मात्र संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही त्याची माहिती डॉक्टरांपर्यंत पोहोचवत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचे अवयवदान होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की, फॉर्म जरी भरलेला असला तरी त्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर तात्काळ आपण संबंधित डॉक्टरांना माहिती देणे गरजेचे आहे. तेव्हाच त्या व्यक्तीचे अवयवदान होऊ शकते. नेत्रदान होऊ शकते, असं डॉ.उदय साकुरीकर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.