नाशिक, 6 मार्च : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला असला तरी स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांनीही सामान्य जनतेला अजून मुलभूत सोयीसुविधांसाठी आणि आरोग्याच्या सुविधांसाठी झगडावे लागत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला आहे. आरोग्य केंद्रात डॉक्टर-नर्स नसल्याने मुलीच्या आईनेच मुलीची प्रसूती करावी लागली आहे. आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं -
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आरोग्य केंद्रात आईलाच मुलीची प्रसूती करावी लागली. अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी कर्मचारी केंद्र सोडून गायब असल्याचा आरोप यावेळी बाळंतपण झालेल्या महिलेच्या आईकडून करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुक्यातीलच आव्हाटे बरड्याचीवाडी येथील एक गरोदर महिला डिलिव्हरीसाठी दाखल झाली होती. यावेळी तिला जोरदार प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यावेळी आरोग्य केंद्रात एकही आरोग्य कर्मचारी अधिकारी नव्हता, असे महिलेच्या आईने सांगितलं आहे.
तसेच ज्यावेळी डिलिव्हरीसाठी मुलीला आरोग्य केंद्रात आणण्यात आले त्यावेळी दरवाजाही बंद होता. रुग्णालयात सिस्टर-डॉक्टर कोणीही हजर नव्हतं, त्यामुळे आम्ही दोन महिलांनी मिळून मुलीची डिलिव्हरी केली, असे प्रसुती झालेल्या महिलेच्या आईने म्हटले आहे.
बीड : "चल तुला चॉकलेट देतो...", पहिलीच्या विद्यार्थिनीवर 60 वर्षांच्या नराधमाने केला अत्याचार
दरम्यान, सुदैवानं गरोदर महिलेची डिलिव्हरी सुखरूप झाली आहे. या प्रकाराने नाशिक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही आरोग्य कर्मचारी नसल्याने आणि उपचार आणि त्याचा लाभ मिळत नसल्याने बाळंतपण झालेल्या महिलेच्या नातेवाईकांसह नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik