मुंबई, 21 जानेवारी : सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांनी केलेल्या बंडावरून छगन भुजबळ यांनी काँग्रेसला टोला हाणला आहे. आपली दारं-खिडक्या बंद ठेवलं तर घरफुटी होऊ शकत नाही, काँग्रेस गाफील राहिली, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. छगन भुजबळांच्या या टोल्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'डॉ. तांबे यांच्याबद्दल माझ्या खूप चांगल्या भावना होत्या, त्यांच्या स्वभावाबद्दल लोकमत चांगलं होतं. त्यांना गर्व नव्हता, पण त्यांनी अचानक असं का केलं माहिती नाही. त्यांनी सरळ सांगायला हवं होतं, सत्यजीतला तिकीट द्या. त्यांनी एबी फॉर्म घ्यायला नको होता. फॉर्म घेऊन तो भरला नाही, त्यामुळे पक्ष अडचणीत आला. इतकंच नाही तर बाळासाहेब थोरात यांचीही यामुळे अडचण झाली,' असं भुजबळ म्हणाले.
विखे पाटलांनी जाहीर करून टाकलं त्यांना पाठिंबा देऊ. आम्ही महाविकासआघाडीसोबत राहणार असल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
'राजकारणात घरफोड्या अनेक वेळा झाल्या, होत असतात. मात्र आपण दार-खिडक्या बंद असेल तर घर फुटी होऊ शकत नाही. काँग्रेसमधील गटबाजी असेल तर ती बाहेर आली असती,' अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी केली.
तांबे कुटुंबियांच्या बंडावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली, भुजबळांच्या टोल्याला पटोलेंचं प्रत्युत्तर#SatyajitTambe #Congress #NCP pic.twitter.com/DWnvoizyL4
— News18Lokmat (@News18lokmat) January 21, 2023
छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. 'भुजबळ नाशिकमध्येच राहतात, नगर तिकडून जवळ आहे. त्यांना जास्त माहिती असेल. महाविकासआघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आहेत, त्यांना निवडून आणण्याचा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न राहील,' असं नाना पटोले म्हणाले.
सत्यजीत तांबेंचं प्रत्युत्तर
छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यावर सत्यजीत तांबे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ साहेबांबद्दल मला प्रचंड आदर आहे, त्यांना पूर्ण पार्श्वभूमी मी निश्चित सांगेन. जेव्हा त्यांना वस्तूस्थिती कळेल तेव्हा त्यांच्या मतात परिवर्तन होईल, असं सत्यजीत तांबे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chagan bhujbal, Nana Patole