जळगाव, 17 मे, नितीन नांदूरकर : गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. अखेर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तरीही अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरूच होती. अखेर शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यानंतर या चर्चेवर पडदा पडला. मात्र आता पुन्हा एकदा अजित पवार हे चर्चेत आले आहेत. जळगावमध्ये भाजपच्या वतीनं लावण्यात आलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.
जाहिरातीची चर्चा
या बॅनरवर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतच अजित पवारांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावात काही ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर अनेक वृत्तपत्रातही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी दिलेल्या जाहिरातीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
महाजनांसोबत पवारांचाही फोटो
या जाहिरातीमध्ये गिरीश महाजनांसोबत अजित पवारांचा देखील फोटो छापण्यात आला आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील फोटो या बॅनरवर छापण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचं भाजपसोबत बोलणं सुरू असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता हे बॅनर झळकल्यानं चर्चा सुरू झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP, Girish mahajan, Jalgaon, NCP