नाशिक, 29 नोव्हेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या (Nashik) कळवण तालुक्यातील विविध विकासकांमाचं भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. तसेच शेतकरी, आदिवासी मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Jhirwal) हे देखील उपस्थित होते. स्थानिक आमदार नितीन पवार यांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान भाषण करताना अजित पवार यांनी राज्यातील सध्याच्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. विशेष म्हणजे अजित पवार यांनी नाशिककरांना विकास कामांसाठी निधीत कमी पडू देणार नाही, असंही आश्वासन दिलं. "तुम्ही आमची भावकी निवडून दिली आहे. त्यामुळे तिजोरी माझ्याकडे आहे. आमदार नितीन पवार यांना काहीही कमी पडू देणार नाही", अशी ग्वाही अजित पवार यांनी नाशिककरांना दिली.
"आमच्या विनंतीचा मान ठेवून आपण आमदार नितीन पवार यांना निवडून दिले आहे. त्यामुळे मी निधी कमी पडू देणार नाही. कोरोनामुळे परिस्थिती बदलली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे उद्घाटन होत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हायला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. आपल्या आघाडीला आपला पाठिंबा राहिला पाहिजे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांनी पुढे जायचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जायचं आहे. सप्तशृंगीच्या साक्षीने आपल्या समोर नतमस्तक होतो. या भागाचे नेते, आजकालचे पुढारी नमस्कार करत नाहीत. त्यांच्या बापाचं काय जातं ते समजत नाही. मी कायम सांगतो सत्ता येते जाते मात्र नम्रता असावी", असा टोला अजित पवारांनी लगावला.
हेही वाचा : 'सौ दर्द छुपे है सिने में, मगर अलग मजा है जिने में', छगन भुजबळांचं शेरोशायरीतून विरोधकांना उत्तर
"काहींनी सरकार चालणार की नाही? यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. देव पाण्यात बुडवले होते. मात्र सरकार काम करतंय. आम्ही शपथ घेतल्यानंतर कोरोना आला. अनेक जवळचे लोक गेले. आणखी एक नवीन विषाणू आला आहे. मी काल आढावा घेतला. आज मुख्यमंत्री घेत आहेत. आई बापाच्या पोटी एकदाच जन्माला येतो. त्यामुळे काळजी घ्यायला हवी. कोरोना प्रतिबंधक लस घ्या. विकासकामे झाले नाही तरी आरोग्यासाठी सरकार म्हणून आम्ही कमी पडणार नाहीत. आम्ही केंद्राशी बोलतोय, एका जोडप्यामुळे राज्यात किती लाख लोकांना कोरोना झाला. त्यामुळे बंधन असावे", अशी सूचना अजित पवार यांनी दिली.
"वन जमिनीसाठी मुंबईत बैठक लावू. हा देखील प्रश्न निकाली काढण्यासाठी निर्णय घेऊ. वणी गडाच्या विकासासाठी 22 कोटींचा निधी दिला आहे. तो कमी पडू देणार नाही. रस्ते विकासासाठी नाशिकवर अन्याय होऊ देणार नाही. या जिल्ह्याने सर्वात जास्त आमदार निवडून दिले आहेत. आता आमची जबाबदारी आहे", असं अजित पवार यांनी सांगितलं.
हेही वाचा : ''सरकारला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद'', मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून मानले जनतेचे आभार
देशात काल-परवा आकडा वाचला. त्यात एक हजार मुलांमागे एक हजार वीस मुली आहेत. ही आनंदाची बातमी आहे, असं मत पवारांनी मांडलं. तसेच "आता आर्थिक शिस्त लावायला हवी. 3 लाखापर्यंत शून्य टक्के व्याज केलं. मात्र ते नियमित भरणाऱ्यासाठी आहे. महिलांनो भावाच्या नात्याने सांगतो महिलांना बचत गटांना कमी व्याजाने कर्ज देण्यासाठी निर्णय घेणार. फक्त वेळेत कर्जफेड करा", असं आवाहन अजित पवारांनी केलं.
"इतके नैसर्गिक संकट राज्यासमोर असताना एसीटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. शरद पवारांनी त्यांच्या अनुभवानुसार मार्ग काढला. मात्र तरीही हे आंदोलन काहींनी सुरुच ठेवलं आहे, जे योग्य नाही. 1982 साली गिरणी कामगारांचा संप झाला तशी अवस्था एसटी कामगारांची होऊ नये. तुटेल इतकं तानू नका. गोरगरिबांची एसटी आहे. सरकार एक पाऊल मागे आलंय. तुम्ही एक पाऊल मागे या. तुम्हीही महाराष्ट्रचे आहात. तुम्हालाही इथली परिस्थिती माहित आहे. तिथे काय काय बोलताय, ही काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का? जे कामगार आले त्यांचे आभार आहे. मी यापूर्वी सांगितले आहे विलीनीकरणावर समिती केली आहे. तिचा निर्णय येऊ द्या", असंदेखील आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.