मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माहीम, सांगली पाठोपाठ आता नाशिकमध्येही अतिक्रमणावरून वाद; हिंदुत्ववादी संघटनाचा इशारा

माहीम, सांगली पाठोपाठ आता नाशिकमध्येही अतिक्रमणावरून वाद; हिंदुत्ववादी संघटनाचा इशारा

नाशिकमध्येही अतिक्रमणावरून वाद

नाशिकमध्येही अतिक्रमणावरून वाद

माहीम आणि सांगली पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील अतिक्रमणावरून नवा वाद उभा राहिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 23 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (बुधवार 22 मार्च) पक्षाच्या पाडवा मेळाव्यात माहीम आणि सांगलीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने त्वरीत हालचाल करत दोन्ही ठिकाणी हातोडा चालवला आहे. माहीम आणि सांगली पाठोपाठ आता नाशिकमध्ये देखील दर्ग्याच्या अतिक्रमणावरून वाद उभा राहिला आहे. नाशिकमध्ये झालेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या हुंकार सभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी या दर्ग्याच्या बाजूला असलेल्या मंदिरात भेट देत अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

माहीममध्ये सुरू झालेल्या दर्ग्याच्या वादाचं लोण आता नाशिकपर्यंत येऊन पोहचलं आहे, नाशिकच्या पेशवेकालीन नवशा गणपती मंदिरासमोर असलेल्या दर्ग्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं असून हे अतिक्रमण मंदिराच्या आवारापर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे हे अतिक्रमण हटवावं अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांचे नेते सुरेश चव्हाणके यांनी केली. इतकेच नाही तर त्यांनी या नवशा गणपती मंदिरात आरती करून शेजारी असलेल्या दर्ग्याच्या अतिक्रमणाची पाहणी देखील केली आणि हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली.

वाचा - राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; अखेर सांगलीतील 'त्या' अनधिकृत बांधकामावर हातोडा

नाशिकच्या नवशा गणपती मंदिराला लागून असलेल्या दर्ग्याच्या आजूबाजूला अतिक्रमण असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केल्यानंतर पालिका प्रशासनाने देखील कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. अतिक्रमण हे अतिक्रमण असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

हिंदुत्ववादी संघटनांच्या इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची भूमिका घेतल्याने आता पालिका प्रशासनाच्या तपासणीत या दर्ग्याच्या आवारात खरोखर अतिक्रमण आहे का हे पालिका प्रशासनाच्या कारवाईतच समोर येईल. मात्र, माहीम पाठोपाठ नाशिकमध्येही दर्ग्याचा वाद उभा राहिल्याने पोलिसांनी या दर्ग्याच्या आणि मंदिराच्या परिसरात मोठा बंदोबस्त उभा केला आहे. परिणामी या परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं.

First published:
top videos

    Tags: Nashik, Raj Thackeray