नाशिक 9 डिसेंबर : शिक्षण जरी कमी असेल,तरी आपण व्यवसायातून चांगला नफा कमवू शकतो हे नाशिक जिल्ह्यातल्या सुनील महाले या आदिवासी तरुणाने दाखवून दिलं आहे. सुनीलनं कमी शिक्षण आणि दुर्गम भाग या प्रतिकूल परिस्थितीवर कष्टानं उभारलेल्या आयुर्वेदीक चहाच्या व्यवसायातून मात केली आहे. त्यामुळे तो आज परिसरातल्या तरुणांसाठी आदर्श बनला आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील आवळपाडा या अतिशय दुर्गम भागात सुनील राहतो. त्याचं बारावीपर्यंतच शिक्षण झालं आहे. घरची परिस्थिती नाजूक असल्यानं उदारनिर्वाहासाठी त्यांना मोलमजुरी करावी लागत असे. या परिस्थितीमुळे सुनीलला पुढील शिक्षण घेणं शक्य नव्हतं. घरच्यांकडं शिक्षणासाठी पैशांची मागणी केल्यापेक्षा आपणच व्यवसाय करुन पैसे कमवू असं सुनीलनं ठरवलं आणि आयुर्वेदीक चहाचा व्यवसाय सुरू केला.
ग्रामीण भागात सहज उपलब्ध असणारी तुळस त्याचबरोबर वेलची,चहा पावडर,दालचिनी,आले,गवती चहा, यापासून चहा बनवला आणि बघता बघता तो सर्वांच्या पसंतीस उतरला,आज दर महिन्याला 30 ते 35 हजारांची कमाई या व्यवसायातून होत असल्याचं सुनीलनं सांगितलं.
युनायटेड नेशन फेलोशिपसाठी आशिया खंडातून फक्त नाशिकच्या मुलीची निवड, Video
आयुर्वेदिक चहाला सर्वांची पसंती
वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची आयुर्वेदीक चहाला पसंती असते. या चहाचे आरोग्याला फायदे होतात तसंच कोणताही साईड इफेक्ट होत नाही. सुनील चहाला लागणाऱ्या सर्व वस्तू जवळपासच्या जंगलातून आणि शेतातून मिळवतो आणि चहा बनवतो. त्यामुळे चहाची चव ही भन्नाट असते. या चहाच्या छोट्या कपाची किंमत 10 रुपये असून दिवसभरात त्यांची चांगली कमाई होते.
यशस्वी व्यवसायाचा मंत्र
आपला व्यवसाय हा लोकांशी निगडित असला तर आपण त्यात चांगली प्रगती करू शकतो. .चहा हा सर्वांचे आवडते पेय आहे. प्रत्येक जण सकाळी उठल्यानंतर चहा हमखास घेतो. तुमचा व्यवसाय किती मोठा आहे त्यापेक्षा तुम्ही नागरिकांना किती दर्जेदार वस्तू पुरवता यावर तुमच्या व्यवसायाचा दर्जा निश्चित होतो. क्वालिटी असेल तर ग्राहक तुम्हालाच पसंती देतात, इतर ठिकाणी ते जात नाही. त्यामुळे त्यामुळे दोन पैसे कमी घ्या, चांगली क्वालिटी द्या,तुमचा व्यवसाय यशस्वी होईल अशी प्रतिक्रिया सुनील महाले यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Nashik, Success story