Elec-widget

नाशिकमध्ये भाजपला महाशिवआघाडी पॅटर्नची धास्ती, नगरसेवकांची काढली सहल पण 7 जण झाले गायब

नाशिकमध्ये भाजपला महाशिवआघाडी पॅटर्नची धास्ती, नगरसेवकांची काढली सहल पण 7 जण झाले गायब

भाजपला स्पष्ट बहुमत असतांनाही भाजपला जड जात आहे. कारण, शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी एक होऊन भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 16 नोव्हेंबर : नाशिक महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधी घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या आधी नगरसेवक फूट नये म्हणून भाजपने आपल्या नगरसेवकांच्या सहलीचा प्लॅन आखला आहे. मात्र, यात 7 नगरसेवकांनी या सहलीत जाण्यास नकार दिल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाशिवआघाडी सरकार स्थापन करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिकेतही तसे संकेत मिळत आहे. येत्या 22 नोव्हेंबरला होणारी नाशिक महापौर पदाची निवडणूक सत्ताधारी भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. स्पष्ट बहुमत असलं तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनं एकत्रित येऊन भाजपला शह देण्याचं ठरवलं आहे. नगरसेवक फुटीचा धोका स्वीकारायला तयार नसल्यानं,भाजप आपल्या नगरसेवकांना सहलीला पाठवत आहे. नाशिकला हे सर्व नगरसेवक एका हॉटेलला एकत्र झाले असून अज्ञात स्थळी रवाना होणार आहे.

विशेष म्हणजे, भाजपला स्पष्ट बहुमत असतांनाही भाजपला जड जात आहे. कारण, शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी एक होऊन भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही.

त्यामुळे आता नाशिकमधील भाजपचे नगरसेवकांच्या सहलीचा प्लॅन आखण्यात आला आहे. परंतु, यातही 7 नगरसेवकांनी सहलीला जाण्यास नकार दिला आहे.

Loading...

भाजपातून राष्ट्रवादी मार्गे शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांचे हे 7 नगरसेवक समर्थक मानले जातात. ही शिवसेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब सानप हे भाजपचे पूर्व नाशिक आमदार होते. परंतु, पक्षांनं तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. आणि त्यानंतर अवघ्या 8 दिवसांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सानप यांचा महापालिकेत प्रभाव आहे. त्यामुळे भाजपचे 14 नगरसेवक ते फोडू शकतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना सानप यांचा मोठा उपयोग करून घेऊ शकते. त्यात सध्या युतीमध्ये ठिणगी पडल्याने आता शिवसेना महापौर बसवण्याच्या तयारीत आहे. यासगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेतेपद सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, मनसे यांच्या साथीनं शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. यात आता बाळासाहेब सानप यांची भूमिका निर्णायक असणार आहे तर गिरीश महाजन यांची कसोटी पहायला मिळणार आहे.

अनुपस्थित नगरसेवक

मछिंद्र सानप

सुनीता पिंगळे

प्रियांका माने

सुमन सातभाई

कमलेश बोडके

पूनम धनगर

विशाल संगमनेरे

नाशिक महापालिकेतील संख्याबळ

एकूण जागा 122

भाजप(स्पष्ट बहुमत)65 होते आता 64

(1 सदस्य सरोज अहिरे राजीनामा देऊन देवळाली मतदारसंघातून राष्ट्रवादी आमदार म्हणून निवडणूक जिंकली)

शिवसेना 34 होते आता 33

(1 सदस्य दिलीप दातीर यांनी राजीनामा देऊन मनसे विधानसभा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण पराभूत झाले)

काँग्रेस - 6

राष्ट्रवादी - 6

मनसे - 5

अपक्ष - 3

रिपाई - 1

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2019 04:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...