नाशिक पालिकेत भाजप नगरसेवकांचा राडा, अंतर्गत कलह चव्हाट्यावर

नाशिक पालिकेत भाजप नगरसेवकांचा राडा, अंतर्गत कलह चव्हाट्यावर

सत्ता आणि पद याचा वाद वाढल्याने भाजपातील अंतर्गत कलह आज चव्हाट्यावर आला.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 24 फेब्रुवारी :  महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य निवाडीवरून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात आज राडा झाला. सत्ता आणि पद याचा वाद वाढल्याने भाजपातील अंतर्गत कलह आज चव्हाट्यावर आला.

नाशिक महापालिकेमध्ये आज अभुतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला.  भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं नगरसेविका प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी गोंधक घालत पक्षाकडे राजीनामा दिला तर शिवसेनेत पूनम मोगरे यांना संधी न मिळाल्याने त्यांच्याही सदस्यांनी गोंधळ घातला.

स्थायी समितीचे आठ सदस्य 29 फेब्रुवारीला निवृत्त होत असून त्यांच्या जागी 8 नवे सदस्य नियुक्त करण्यासाठी विशेष महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाली. यावेळी भाजपकडून हेमंत शेट्टी, सुप्रिया खोडे, वर्षा भालेराव, शिवसेनेकडून सत्यभामा गाडेकर आणि सुधाकर बडगुजर तर काँग्रेसकडून राहुल दिवे तसंच राष्ट्रवादीकडून समीना मेमन यांच्या नावांची घोषणा केली. मात्र, संख्याबळाच्या आधारावर 3 सदस्य असावे या मागणीवर शिवसेना आग्रही होती. आता नाराज शिवसेना,या निवडीला कोर्टात खेचणार आहे.

उमेदवारी न मिळाल्याने प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी सभागृहाबाहेर गोंधळ घालत विशिष्ट समाजाला डावलले जात असल्याचा आरोप केला. दरम्यान, या गोंधळामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सदस्य नियुक्त केले आणि तत्काळ सभा संपविली. यानंतर घाटे समर्थक रामायण या महापौर निवासस्थानी ठाण मांडून बसले.

अखेर महापौर सतीश कुलकर्णी यांनी प्रियांका यांच्या सोबत चर्चा केली. त्यांची नाराजी तात्पुरती दूर करण्यात त्यांना यश मिळालं असलं तरी पुन्हा हा संघर्ष पेटणार हे नक्की.

सत्ता म्हटलं की पद आलं, पद आलं की इच्छुकांनी संख्याही वाढते.आणि पद नाही मिळालं की, नाराजी ही आलीच. आता याच नाराजीचा फटका सत्ताधारी भाजपला बसणार का ? या नाराजांसोबत चर्चा करून पुन्हा योग्य समन्वय साधला जाणार का? हे प्रश्न आज जरी अनुत्तरीत असले तरी, सत्ताधारी भाजपला आज त्यांच्याच शिलेदारांनी जेरीस आणलं हे नक्की. आता याचाच फायदा विरोधक कसा घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2020 05:56 PM IST

ताज्या बातम्या