नाशिक, 12 डिसेंबर : जम्मू-काश्मीर सीमा रेषेवर देशाचे संरक्षण करत असताना महाराष्ट्राच्या आणखी एका सुपुत्राला वीरमरण आले आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील मेजर सुरेश घुगे डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे शहीद झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील अस्तगाव इथं राहणारे मेजर सुरेश घुगे हे जम्मू-काश्मीर सीमेवर कर्तव्यावर होते. गस्त घालत असताना सुरेश घुगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
मेजर सुरेश घुगे यांचं पार्थिव रविवारी त्यांच्या मुळगावी अस्तगावात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. मेजर सुरेश घुगे यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राने आणखी सुपुत्राला गमावले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चरण तालुका( शाहूवाडी) येथील राहणारे अमित भगवान साळोखे (वय 30) यांचं बालाघाट मध्य प्रदेश येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी दिनांक 10 डिसेंबर रोजी निधन झाले. भगवान साळोखे हे ड्युटीवर तैनात असताना संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भगवान साळोखे हे 123 बटालियन केंद्रीय राखीव पोलीस( C.R.P.F) मध्ये बालाघाट मध्य प्रदेश येथे कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ते 2009 ला केंद्रीय राखीव पोलीस दलामध्ये भरती झाले होते.
त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे घरी व गावात समजताच या परिसरात शोककळा पसरली. अमित यांचे दहावीपर्यंत शिक्षण हे रामगिरी विद्यालय चरण येते तर अकरावी बारावी शिक्षण सरूड कॉलेज येथे झाले होते. त्यांचे पश्चात आई वडील, पत्नी, 2 वर्षाची मुलगी, बहीण ,चार चुलते असा मोठा परिवार आहे.