नाशिकवर कुणाचा झेंडा? हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ आमनेसामने

नाशिकवर कुणाचा झेंडा? हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ आमनेसामने

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिकच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. इथे शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांच्याशी आहे. नाशिकमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होते आहे. त्यामुळे राज यांच्या युतीविरोधी प्रचाराला मतदार कसा प्रतिसाद देणार यावर इथली मतांची गणितं अवलंबून आहेत.

  • Share this:

प्रशांत बाग

नाशिक, 26 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिकच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. इथे शिवसेनेचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांच्याशी आहे.

समीर भुजबळ यांनी 2009 च्या लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसेंना हरवलं होतं. त्यावेळी हेमंत गोडसे मनसेमध्ये होते. त्यानंतर 2014 मध्ये हेमंत गोडसे युतीचे उमेदवार म्हणून निवडून आले आणि त्यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केला.

मराठा समाजाची मतं निर्णायक

आता पुन्हा हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ आमनेसामने आहेत. नाशिकमध्ये मराठा समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात. शहरी भागातल्या मतदारांचा कल हेमंत गोडसे यांच्या बाजूने दिसतो तर ग्रामीण भागात समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे हे बरोबरीने चालले आहेत, असं चित्र आहे.

राज ठाकरेंची सभा

नाशिकमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होते आहे.नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला होता. महापालिकेपासून विधानसभेपर्यंत इथे मनसेचं वर्चस्व होतं. त्यामुळे राज यांच्या युतीविरोधी प्रचाराला मतदार कसा प्रतिसाद देणार यावरही इथली मतांची गणितं अवलंबून आहेत.

माणिकराव कोकाटेंची उमेदवारी

नाशिकमध्ये यंदा युतीविरुद्ध आघाडी अशीच लढत आहे पण माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची अपक्ष उमेदवारी आणि बहुजन वंचित आघाडीने ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे ही लढत चौरंगी बनली आहे. अशा वेळी कोणाची उमेदवारी कोणत्या उमेदवाराला फायद्याची आणि तोट्याची ठरते यावर उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे.

अटीतटीची लढत

काही अपवाद वगळले तर नाशिक मतदारसंघाने सलग दुसऱ्यांदा तोच खासदार निवडून दिलेला नाही. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक अटीतटीची आहे. त्याचप्रमाणे तुरुंगातून सुटल्यानंतर समीर भुजबळ यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. गेल्या निवडणुकीत गोडसेंनी छगन भुजबळ यांचा पराभव केला होता. त्याचा वचपा काढण्याचा प्रयत्न समीर भुजबळ करत आहेत.

वंचित बहुजन आघाडी

निवडणुकीच्या आधी बहुजन वंचित आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी घोषणा केली होती. पण समीर उमेदवार झाल्यामुळे त्यांनी पवन पवार यांना उमेदवारी दिली आणि आघाडीसमोर आव्हान उभं केलं.

माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे ते अपक्ष लढत आहेत. त्यांची उमेदवारी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखीची ठरली असून त्याचा फायदा आघाडीला होण्याची शक्यता अधिक आहे.

तर वंचित आघाडीचा फटका राष्ट्रवादीलाही बसण्याची भीती आहे.

रखडलेले प्रकल्प

महापालिकेची करवाढ, आघाडी सरकारच्या काळात मंजूर होऊनही रखडलेले प्रकल्प हेही या निवडणुकीतले कळीचे मुद्दे आहेत.हे सगळं पाहता मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात यावर इथली समीकरणं अवलंबून आहेत.

====================================================================================

VIDEO : नाशिकच्या सभेत मुख्यमंत्र्यांचा भुजबळांवर घणाघात

First published: April 26, 2019, 5:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading