VIDEO: नाशिकमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, कार गेली वाहून

VIDEO: नाशिकमध्ये मुसळधार पावसाचं थैमान, कार गेली वाहून

राज्याच्या काही भागात परतीच्या पावसाने अक्षरश: हाहाकार उडाला आहे. नाशिक जिल्ह्यात थर पावसाने धुमाकूळ घातला आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, (प्रतिनिधी)- राज्याच्या काही भागात परतीच्या पावसाने अक्षरश: हाहाकार उडाला आहे. नाशिक जिल्ह्यात थर पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह नाशकात मुसळधार पाऊस अक्षरशः कोसळत आहे. रामकुंड, सीताकुंड, लक्ष्मण कुंड, अस्थी विसर्जन कुंड पूर्णपणे पाण्याखाली गेली असून या पावसाने नाशिककरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी आल्याने अनेक वाहनं पाण्याखाली गेली आहेत.

यातच गोदावरी नदी पात्रात अचानक वाढ झाल्याने एक मारुती आणि स्विफ्ट कार वाहून गेली. त्यात स्विफ्ट कारला वाचवण्यात नागरिकांना यश आले आहे. शहरातील जुने नाशिक, द्वारका, शालीमार, इंदिरानगरसह विविध परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून शहरातील सराफा भागातील रस्त्यांना नदीचे रुप आले आहे. तसेच अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाचे तीन बळी...

नाशिकमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात दोघांचा तर दिंडोरीत एकाचा मृत्यू झाला आहे. यमुना गांगोडे (वय-65, रा.दिंडोरी), भरत भले व हीराबाई सदगीर (रा.इगतपुरी) अशी मृतांची नावे आहेत. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथेही परतीच्या पावसाचा तडाखा बसला आहे. रोझोद्यात ज्वारीचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जालन्यात वीज पडून 3 ठार, 2 जखमी

जालन्यातील भागडे सावरगाव येथे वीज पडून 3 ठार तर 2 जण जखमी झाले आहेत. रविवारी दुपार ही घटना घडली. सोयाबीन सोंगणीचे काम करत असताना शेतात काम करणाऱ्यांवर वीज कोसळली. मृतांमध्ये 2 महिलांसह 1 पुरुषाचा समावेश आहे.

जालना तालुक्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील भागडे सावरगाव शिवारात वीज कोसळून 3 जणांचा जागेवर मृत्यू झाला. गयाबाई नाईकनवरे, संदीप पवार यांच्यासह आणखी एक महिला या घटनेत मृत्युमुखी पडली आहे. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम आहे. सोयाबीन सोंगणीच्या कामासाठी शेती गेलेले असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जखमी झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुलावरून तिघे गेले वाहून...

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे मोरगाव पुलावरून तिघे वाहून गेले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना पहाटे सव्वा पाच वाजेदरम्यान घडली. म्हणकाली देवीच्या आरतीसाठी ही दुर्घटना घडली. एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, सांगली जिल्ह्याच्या पूर्वेकडील दुष्काळी टापूत शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. तासगाव तालुक्याच्या पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागाला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे ओढे नाले तुडूंब भरुन वाहू लागले आहेत. अग्रणी नदीला पूर आला आहे. तासगाव तालुक्यातील सावळज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी नदी दुथडी भरुन वाहत आहे. सलग चार-पाच पाऊस सुरूच होता. तासगाव तालुक्याच्या पूर्वेकडील वायफळे, बिरणवाडी, सिध्देवाडी, दहिवडी, सावळज, अंजनी, गव्हाण, वडगाव, नागेवाडी आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, बोरगाव, शिरढोण, अलकुड एम, कवठेमहांकाळ शहर, लांडगेवाडीसह पश्चिम भागातही तूफान पाऊस झाला.

मुसळधार पावसामुळे अग्रणी पात्रातील सावळज-बिरणवाडी व मळणगाव-योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले. याशिवाय खेड्यांना जोडणारे ओढा पात्रावरील छोटे पूल अद्यापही पाण्याखालीच आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nashik
First Published: Oct 6, 2019 07:09 PM IST

ताज्या बातम्या