लक्ष्मण घाटोळ, (प्रतिनिधी)
नाशिक, 2 सप्टेंबर: नाशिकच्या इगतपुरी वाडी वऱ्हे औद्योगिक वसाहतीत एक संतापजनक घटना घडली आहे. किमान वेतन आणि पगार वाढ या मूलभूत अधिकारांची मागणी करणार्या कर्मचार्यांना कंपनी मालक आणि व्यवस्थापकानं कंपनीमध्ये बाउन्सर बोलावून मारहाण केली. नाशिकच्या वाडीवर्हे येथील फेब्रिकेशनंच काम करणाऱ्या फॅब कंपनीत घडलेल्या या संतापजनक घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेही वाचा...तुकाराम मुंढेंनंतर विश्वास नांगरे पाटील यांचीही बदली; राज्यात मोठे फेरबदल
दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर सामाजिक संघटना आणि कामगार संघटना आक्रमक झाल्या आहे. स्थानिक तरुणांवर बाउन्सर कडून बेदम मारगाण करण्यात आली आहे. या संतापजनक घटनेप्रकरणी संबंधित कंपनी मालकाविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्याची मागणी छावा संघटनेचे करण गायकर यांनी केली आहे.
या प्रकरणी नाशिकच्या वाडीवर्हे पोलिस ठाण्यात संबंधित कंपनी व्यवस्थापक सचिन चाफेकर विरोधात कामगारांना मारहाण केल्याप्रकरणी किरकोळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये कंपनी मालकांकडून कामगारांना कशाप्रकारे दमदाटी केली जाते. हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. या शिवाय ज्या बाउन्सरला बोलावून गुंडगिरी करण्यात आली. त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
हेही वाचा...महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, एकनाथ खडसेंनी स्वपक्षीयांचे टोचले कान
आता नाशिक शहरामध्ये आणि आणि ग्रामीण भागामध्ये भांडवलदारांकडून गुंडांच्या ऐवजी बाउन्सरचा वापर करून कामगारांवर धडपशाही केली जात असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. त्यामुळे आता या कंपनी मालकाविरोधात आणि बाउन्सर विरोधात पोलिस कठोर कारवाई करणार की थातुरमातुर कारवाई करून या गुंडगिरीला पाठीशी घालणार, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.