Home /News /maharashtra /

नाशिकमध्ये 23 वर्षीय तरुणाने केलं भयानक कृत्य, आजोबांचा खून करून मृतदेह नाल्यात फेकला

नाशिकमध्ये 23 वर्षीय तरुणाने केलं भयानक कृत्य, आजोबांचा खून करून मृतदेह नाल्यात फेकला

नातवाच्या त्रासाला कंटाळून रघुनाथ यांनी हरसूल पोलीस ठाण्यात जाऊन महिनाभरापूर्वी तक्रार दिली होती.

नाशिक, 13 ऑक्टोबर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आजोबांना घराबाहेर जाण्यास नातवाने रोखलं. मात्र यामुळे मंदिरात जाण्यासाठी उत्सुक असलेले आजोबा नाराज झाले आणि त्यांनी आपलं गाऱ्हाणं थेट पोलिसांकडे मांडलं. मात्र याचा राग मनात धरुन नातवाने आजोबांचा चक्क खून करुन तोंडाला चिकटपट्टी लावून हातपाय बांधून मृतदेह चारचाकीतून शहरी भागातील एका नाल्यात फेकून दिला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी ( दि .13 ) उघडकीस आला आहे . याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी नातू किरण निवृत्ती बेंडकुळे ( 23 ) यास अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली मारुती ओमनी कार जप्त केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गिरणारेजवळील धोंडेगावात राहणाऱ्या रघुनाथ श्रावण बेंडकुळे ( 70 ) या वृद्धाचा त्यांचा नातू किरण याने निघृणपणे खून केला. आजोबा वृद्ध असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगून वृद्ध रघुनाथ विनाकारण घराबाहेर किंवा मंदिरात जातात म्हणून त्यांना कित्येक दिवस नातू किरण हा लोखंडी साखळीने घरात बांधून ठेवत असल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे. नातवाच्या त्रासाला कंटाळून रघुनाथ यांनी हरसूल पोलीस ठाण्यात जाऊन महिनाभरापूर्वी तक्रार दिली होती . आजोबांनी तक्रार केल्याचा राग अनावर झाल्याने संशयित आरोपी किरण याने गेल्या रविवारी रात्री आजोबा रघुनाथ यांना रात्री उशिरा घराबाहेर झोपलेले असताना तोंडाला घट्ट चिकट पट्टी लावून तसेच हातापायाला लोखंडी साखळी बांधून त्यांना मारुती ओमनी गाडीत ( एम एच 15 इबी 3919 ) टाकलं. त्यानंतर गाडी धोंडेगावमार्गे मखमलाबाद येथून आडगाव शिवारातील ओढा गावात असलेल्या नाल्याकडे आणली व तेथे मृतदेह नाल्यात फेकला. दुसऱ्या दिवशी ओढाच्या नाल्यात एका वृध्द इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान खान यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार सुरेश नरवाडे , दशरथ पागी , गणपत ढिकले , देविदास गायकवाड आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली . मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर हा प्रकार हा घातपाताचा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले . पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आणि पोलिसांच्या तपासाला यश आले वृद्ध इसमाचा खून झाल्याची खात्री पटली. आडगाव पोलिसांनी त्यानुसार सुरुवातीला अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढे तपास सुरू ठेवला.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Nashik

पुढील बातम्या