मुंबई 29 मे : नरेंद्र मोदी हे 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात कोण कोण असतील याची चर्चा सुरू झालीय. शिवसेनेकडून दोन जणांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अनिल देसाई यांच्यासोबतच खासदार अरविंद सावंत यांचीही वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सावंत यांची या आधीची लोकसभेतलं कामही चांगलं होतं. ते लोकसभेतही सक्रिय खासदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांची निवड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून 1 लाख मतांच्या फरकाने विजयी मिळवला होता. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा त्यांनी पराभव केला. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 30 मेला पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा दिमाखदार सोहळा होणार आहे.जगभरातले 6 हजार मान्यवर या समारंभाला उपस्थित राहतील. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे या समारंभाला उपस्थित राहतील. युती झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांचे संबंध अतिशय मधूर राहिले आहेत. या आधी उद्धव हे अमित शहा उमेदवारी अर्ज भरताना गांधीनगरला उपस्थित होते. त्यानंतर नरेंद्र मोदी वाराणसीमधून अर्ज भरतानाही ते उपस्थित होते. नंतर NDAच्या बैठकीला आणि नंतर नरेंद्र मोदी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करतानाही उद्धव यांना मानाचं स्थान देण्यात आलं होतं.
शिवसेनेला मंत्रिमंडळातला वाटा किती?
केंद्रीय मंत्रिमंडळ रचनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची आजही बैठक झाली. शिवसेनेला दोन कॅबिनेट मंत्रिपदं तर एक राज्यमंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशात शिवसेनेचाही मोठा वाटा आहे. त्यामुळेच मंत्रिपदासह लोकसभेचे उपसभापती पदही शिवसेनेला दिलं जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यातील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
शिवसेनेकडून विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मुंबई अशा सर्व विभागांना प्रतिनिधित्व देण्यासाठी या भागातील खासदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई, विनायक राऊत, भावना गवळी यांची नावं आघाडीवर आहेत.