राणेंचा 'स्वाभिमान' लवकरच भाजपमध्ये होणार विलीन

आमदार नितेश राणे हे सध्या भाजपच्या तिकिटावरच कणकवली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 09:00 AM IST

राणेंचा 'स्वाभिमान' लवकरच भाजपमध्ये होणार विलीन

मुंबई, 11 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लवकरच भाजपमध्ये विलीन होणार आहे. राणे कुटुंबाचा भाजपप्रवेश निश्चित झाला होता. आमदार नितेश राणे हे सध्या भाजपच्या तिकिटावरच कणकवली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राणेंच्या स्वाभिमान पक्षाची भाजपमध्ये विलीन होण्याची औपचारिकता 15 ऑक्टोबरला पूर्ण होणार असल्याची माहिती आहे.

भाजप शिवसेनेची युती झाली असली तरीही कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यासमोर शिवसेनेच्या सतीश सावंत यांचं आव्हान असणार आहे. सतीश सावंत हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. गेली 24 वर्ष ते नारायण राणेंचे सहकारी होते. मात्र नितेश राणे यांच्या कामाच्या पद्धतीमुळेच आपण पक्ष सोडल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. राणेंचा आपल्यावर विश्वास राहिला नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.

नारायण राणे आणि राजकीय आव्हान

महाराष्ट्राच्या राजकारणात काही व्यक्ती सतत चर्चेत असतात. नारायण राणे हे त्यातलंच एक नाव. पण सध्या नारायण राणेंची राजकीय अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. तसंच त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे वैभव नाईक हे जाएंट किलर ठरले होते. त्यांनी थेट नारायण राणेंना पराभवाची चव चाखायला लावली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निलेश राणेंना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यामुळे राणेंच्या राजकारणाला उतरती कळा लागली आहे, असं बोललं जाऊ लागलं.

Loading...

राज्यातील राजकारणात राणेंना दोन मोठे धक्के

कोकणातील राजकारणाची पकड सैल झाल्याने स्वाभाविकच राणेंच्या राज्यातील राजकारणावरही मोठा परिणाम झाला. काँग्रेस नेतृत्वाकडून त्यांचं खच्चीकरण करण्यात आलं आणि राणेंनी काँग्रेस सोडली. पण राणेंसाठी हा शेवटचा धक्का नव्हता. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मधल्या काळात राणेंनी भाजपमध्ये जाण्यासाठीही जोरदार प्रयत्न केले. पण भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेशही होऊ शकला नाही. त्यामुळे राणेंची चांगलीच अडचण झाली.

राजकीय कमबॅकसाठी विजय आवश्यक

नितेश राणेंच्या भाजप प्रवेशानंतर कोकण आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत विजय खेचून आणणं राणेंसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री होण्यासाठी एकाने 20 कोटी मोजले, अजित पवारांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 08:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...