Home /News /maharashtra /

'संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे?' नारायण राणेंचा खोचक सवाल

'संजय राऊत शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे?' नारायण राणेंचा खोचक सवाल

"संजय राऊत (Sanjay Raut) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यालयातच असतात. ते शिवसेनेचे (Shiv Sena) आहेत असं दाखवतात. पण संजय राऊत तसे नाहीत. त्यांनी शिवसेनेत काय केलं?", असा सवाल नारायण राणेंनी केला.

पुढे वाचा ...
    विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 11 डिसेंबर : "शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शिवसेनेचे (Shiv Sena) आहेत की राष्ट्रवादीचे (NCP)? दिल्लीत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कार्यालयातच असतात. ते शिवसेनेचे आहेत असं दाखवतात. पण संजय राऊत तसे नाहीत. त्यांनी शिवसेनेत काय केलं? लावालावीचं काम करणं त्याचं नाव संजय राऊत", असा घणाघात भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली.

    राणेंचा शिवसेनेवर घणाघात

    नारायण राणे यांच्या संसदेतील भाषणावरुन ट्रोल करण्यात आलं होतं. याबाबत विचारलेल्या प्रश्नावरुन राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. "मला विचारलेला प्रश्न समाजाला होता. अधक्ष्यांना वाटलं तो प्रश्न समजला नसेल म्हणून अध्यक्षांनी तो पुन्हा सांगितला. जे काही करायचे आहे ते करा. मी पूर्ण तयारीने गेलो होतो. कोणतेही कागदपत्रे हातात न घेता उद्योगा संदर्भात माहिती दिली होती. शिवसेनेनी ट्रोल केलं. त्यांना काय करायचं ते करु दे. पण आपण सुद्धा याचं उत्तर देवू", अशी भूमिका राणेंनी मांडली.

    'ज्यांच्यावर छापे मारले ते संन्यासी होते का?'

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर करुन विरोधकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या आरोपांवर नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिली. "ज्यांच्यावर छापे मारले ते संन्यासी होते का? राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती", असं सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उत्तर दिलं. "राज्यातलं आताच सरकार चालत नाहीय. हे सरकार एसटी कामगारांचा प्रश्न सोडवू शकत नाही. राज्याचा विकास रखडलाय. नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाहीत. केंद्रातले मला अनेक जण येवून सांगतात की सन्माननीय सुप्रिया सुळे यांना हे सांगा", असा टोला नारायण राणेंनी लगावला.

    छगन भुजबळांवरही निशाणा

    "मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताबद्दल दिसणार. मी 55 वर्ष राजकारणात आहे. त्यामुळे यासाठीचे धोरण मी सांगणार नाही. तीन पक्षांना निवडणूक कुठलीच नकोत. लोकं त्यांना निवडून देणार नाहीत. हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे निवडणुका नको आहेत आणि त्यापुढे ढकलल्या जातायत. हे पुढे ढकलण्याचं काम मंत्री छगन भुजबळांकडे दिलं गेलंय", अशी खोचक टीका नारायण राणेंनी केली.

    'देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटायला विनोद तावडेंना दिल्लीत पाठवलं नाही'

    "भाजप नेते विनोद तावडे हे महासचिव आहेत. ते महाराष्टापुरते नाहीत. भाजप नेते देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटायला दिल्लीत त्यांना पाठवलं नाही. पंख छाटायला विनोद तावडे एकटे नाहीत. त्यांच्यावर भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे तसं होणार नाही", असं नारायण राणे म्हणाले. "मुंबई-गोवा महामार्गाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालं. मात्र रत्नागिरीत तसे नेते नाहीत. वादामुळे तो रस्ता तसाच राहिला. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो आहे", अशी प्रतिक्रिया यावेळी राणे यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या