दसऱ्याआधी पत्ते उघडणार, नारायण राणेंचा अखेरचा डाव अजून बाकी

दसऱ्याआधी पत्ते उघडणार, नारायण राणेंचा अखेरचा डाव अजून बाकी

21 तारखेला मोठी घोषणा करणार होते मात्र याबद्दल राणे काही बोललेच नाही. आता दसऱ्याला संपूर्ण पत्ते उघडणार अशी नवी घोषणा करून नारायण राणेंनी अखेरची चाचपणी सुरू केलीये.

  • Share this:

21 सप्टेंबर : नारायण राणे यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकलाय. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. पण 21 तारखेला मोठी घोषणा करणार होते मात्र याबद्दल राणे काही बोललेच नाही. आता दसऱ्याला संपूर्ण पत्ते उघडणार अशी नवी घोषणा करून नारायण राणेंनी अखेरची चाचपणी सुरू केलीये.

नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये बंड पुकारणं हे नवीन नाही. याआधीही नारायण राणेंनी तीन वेळा बंड पुकारलं होतं. पण तिन्ही वेळा पक्षाच्या वरिष्ठांशी बोलल्यानंतर राणेंनी तलवार म्यान केलं होतं. पण यावेळी भाजपच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या नारायण राणेंचा अद्याप भाजपप्रवेश झाला नाही. पण, त्याआधीच आज ठरल्याप्रमाणे राणेंनी पक्षाचा राजीनामा दिलाय.

सिंधुदुर्गात सभा झाल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेस का सोडलं यांचं स्पष्टीकरण दिलं. काँग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय झाला. माझा हवा तसा वापर केला गेला नाही उलट अशोक चव्हाणांनी वेळोवेळी माझा अपमान केला. मुळात अशोक चव्हण हे प्रदेशाध्यक्षपदाच्या लायकीचे नाही. त्यामुळे काँग्रेस सोडताना मला कोणताही पश्चाताप होत नाहीये

आता मी मोकळा झालोय अशी भावनाच राणेंनी व्यक्त केली. तसंच नागपूरपासून राज्यव्यापी दौरा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं.

'सेनेचे 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत'

उद्धव ठाकरे सत्तेसाठी नाक घासतायत. शिवसेनेचे 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे परवा 'मातोश्री'वर राडा झाला, रडारड झाली. जो रडेल त्याला मी मदत करण्यास तयार आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी सेनेत जाणार, परत कधीच शिवसेनेत जाणार नाही असं राणेंनी स्पष्ट केलं.

'राज ठाकरेंचाच फुटबाॅल झालाय'

भाजपने सिंधुदुर्गात एका फुटबाॅल केलाय अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली होती. राज ठाकरेंच्या या टीकेला राणेंनी आपल्या शैलीत उत्तर दिलंय. खरंतर राज ठाकरेंचाच फुटबॉल झालाय. त्यांचा फक्त एकच आमदार आहे. आता त्यांना काय उत्तर देणार असा टोला राणेंनी लगावला,

'नितेश राणे योग्य वेळी राजीनामा देतील'

काँग्रेस आणि शिवसेनेचे अनेक आमदार राजीनाम्याच्या तयारीत आहे. सेनेचे 27 आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. मी काँग्रेस सोडलं असलं तरी नितेश राणे केव्हा राजीनामा देईल ते योग्य वेळी सांगू असं राणेंनी स्पष्ट केलं.

First published: September 21, 2017, 5:37 PM IST

ताज्या बातम्या