Home /News /maharashtra /

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात, 13 बोलेरो गाड्यांच्या मालकांना बँकेच्या नोटीसा

राणे पितापुत्र अडकले नव्या वादात, 13 बोलेरो गाड्यांच्या मालकांना बँकेच्या नोटीसा

नितेश राणे यांच्या ताफ्यात दिसणारी आणि रत्नागिरीच्या देवेंद्र वणजू या तत्कालीन काँग्रेस कार्यकर्त्याच्या नावावर खरेदी झालेली इनोव्हा सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : भाजपचे नेते नारायण राणे (narayan rane) आणि शिवसेना यांच्यातला वाद कधी कुठल्या गोष्टीवरुन पेटेल सांगता येत नाही. सध्या पेटलेल्या वादाचं कारण आहे ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने (Sindhudurg District Bank) थकीत कर्जापोटी राणेंच्या ताफ्यात असलेल्या 1 इनोव्हा आणि 13 बोलेरो गाड्यांच्या मालकांना बजावलेल्या 101 च्या नोटीसा. नितेश राणे यांच्या ताफ्यात दिसणारी आणि रत्नागिरीच्या देवेंद्र वणजू या तत्कालीन काँग्रेस कार्यकर्त्याच्या नावावर खरेदी झालेली इनोव्हा सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारासाठी खरेदी करण्यात आलेल्या 13 बोलेरो आणि एक इनोव्हा या गाड्यांच्या मालकांना 15 लाखांहुन अधिक रक्कमेच्या थकीत कर्जापोटी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने 101 च्या नोटीसा बजावल्या आहेत. "तेरा गाड्यांपैकी चार गाड्या आमच्या संचालकांच्या नावावर होत्या. आम्ही त्यावेळी पक्षाचे पदाधिकारी होतो पण जिल्हा बॅंकेच्या संचालक पदामधून आम्ही बाद होऊ नये म्हणून या बोलेरो गाड्यांचे पैसे आम्ही आमच्या स्वत:च्या अकाउंटमधून भरलेले आहेत आणि आज या गाड्या नितेश राणे किंवा राणेंच्या ताफ्यात या गाड्या वापरल्या जातात. त्यांच्या बंगल्याच्या आवारात या गाड्या असतात. या आजही गाड्या आमच्या ताब्यात नाही', असं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले. नारायण राणे यांची साथ सोडून शिवसेनेत जाऊन  नितेश राणेंविरोधात 2019 ची कणकवली विधानसभा लढवणारे सतीश सावंतच सध्या बँकेचे अध्यक्ष असल्यामुळे ही राजकीय आकसाची कारवाई आहे, असं भाजपने म्हटलं आहे. तर  आताचे भाजप आणि विद्यमान चेअरमन यांनीच काँग्रेसमध्ये असताना जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करुन केलेली ही खरेदी असल्याचं मनसेने म्हटलं आहे. 'आज ह्याच राजकारण करता कामा नये. प्रत्येकाचे विषय आहेत. आज जो बँकेचे पैसे वापरतो त्यात शिवसेनेचे लोक नाहीत? त्यात काँग्रेसचे नाहीत? राष्ट्रवादीचे लोक नाहीत का ? वेगवेगळे जे व्यावसायिक आहेत. त्यांच्यावर स्टॅम्प आहे का ? त्या त्या वेळी ज्याच्या ज्याकडे सत्ता होती त्या त्यावेळी त्यांनी असं केलेलं आहे, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष  राजन तेली यांनी केली. 'आजचे भाजप पदाधिकारी त्यावेळी काँग्रेसमध्ये होते आणि त्यावेळी सतीश सावंतही कॉंग्रेसमध्ये होते जर आता सतीश सावंत यांना हा घोटाळा दिसत असेल तर मधल्या काळात त्यांना हा घोटाळा दिसला नाही का? आणि कर्ज वितरण करताना सतीश सावंत यांना जनतेचे हित बघता आलं नाही का ? ही शेतकऱ्यांच्या पैशाची उधळपट्टी आहे" अशी टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईच्या डिलर कडून एकाच दिवशी केवळ 74  हजार रुपये डाउनपेमेंट करुन खरेदी करण्यात आलेल्या 13 बोलेरो गाड्यांची खरेदी ही  सिंधुदुर्गातल्या मालकांचे भिवंडीत दाखवण्यात आलेले पत्ते आणि आचारसंहितेचा भंग या कारणामुळे वादात आली होती. आता राणेंसोबत असलेल्या भाजपनेच या खरेदीला न्यायालयात तेव्हा आव्हान दिल होतं. पोलिसांनी या बोलेरो गाड्या न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जप्तही केल्या होत्या. मात्र, या गाड्यांचे कर्ज थकल्यामुळे शिवसेनेला राणेंविरोधात राजकारणाचा आता एक नवा मुद्दा चालून आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: नारायण राणे, नितेश राणे

पुढील बातम्या