पंढरपूर, 18 जानेवारी : राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) सुरू असून निकालाचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. पंढपूरमध्ये नारायण-चिंचोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गटाने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, या गटासाठी ज्येष्ठ अभिनेत्री अलका कबुल यांनी प्रचार केला होता. त्यांचा प्रचार हा निर्णयाक ठरला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू असून काही ठिकाणी निकाल जाहीर झाले आहे. विजयी उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. पण पंढरपूरमधील नारायण-चिंचोली येथील ग्रामपंचायत निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची आणि रंगदार ठरली होती. विशेष म्हणजे, परिचारक गटाने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 'माहेरची साडी फेम' ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी बोलावले होते. अलका कुबल यांनी परिचारक गटाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला होता. काही महिन्यांपूर्वी अलका कुबल यांचा धुरळा सिनेमा आता होता. त्यामुळे प्रचाराला आणखी रंगत आली होती.
परिचारक गटाने अलका कुबल यांना बोलावले म्हणून विरोधी पॅनलने साताऱ्याची डान्सिंग क्वीन आणि अभिनेत्री माधुरी पवार यांना प्रचारात उतरवले होते. त्यामुळे गावात प्रचाराला एकच रंगत आली होती. पण तरीही अभिनेत्री अलका कुबल यांचा प्रचार सरस ठरला असून परिचारक गटाने निसटता विजय मिळवला आहे. परिचारक गटाने काठावर सत्ता मिळवली आहे. परिचारक गटाने 5- 4 अशा फरकाने विजय मिळवला आहे.
विजयसिंह मोहिते पाटलांनी राखला गड
दरम्यान, राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अकलूज ग्रामपंचायतचा गड राखण्यात भाजप नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना यश आले आहे. 17 पैकी 14 जागा विजयसिंह मोहिते पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर त्यांचे पुतणे डॉ धवलसिंह मोहिते पाटलांना तीन जागांवर समाधान मानावे लागले.
मात्र, संग्रामसिंह मोहिते पाटकांचा पराभव म्हणजे आमचा गड आला पण सिंह गेला अशी प्रतिक्रिया धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली. चुलता विरुद्ध पुतण्या अशी ही निवडणूक गाजली होती. मात्र, अकलूजकारांनी पुन्हा विजयसिंहांवर विश्वास दाखवला. माळशिरस तालुक्यातील 70 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा विजय झाला आहे, असा दावा धैर्यशील यांनी केला आहे. हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांचा विजय असल्याचं ते म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.