निलेश पवार, नंदुरबार, 17 आॅगस्ट : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात एकाच रात्रीतून झालेल्या मुसळधार पावसाने हाहा:कार माजवलाय. आतापर्यंत या पुरात पाच जणांचा मृत्यू झालाय. आपला जीव वाचवण्यासाठी एका वृद्ध दाम्पत्याने आटोकात प्रयत्न केला. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 65 वर्षीय वृद्ध महिला वाहून गेली आणि तिचा मृत्यू झाला. वयाच्या अखेरच्या टप्प्यात एकमेकांची साथ या पुरामुळे तुटली.
शुक्रवारी पहाटे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजला. अनेक नद्यांना आलेल्या पुरात मोठे नुकसान झाले आहे. बिसरवाडी जवळील सरपणी नदीच्या किनारी बालाहाट गावाजवळ जामानाबाई लाश्या गावित या ६५ वर्षीय महिलेचा पुराच्या पाण्यात वाहुन मृत्यू झाला. तिचा मृतदेह मिळालाय. जामानाबाईचा पतीही पाण्यात वाहून गेला. पण पाण्यात वाहत असताना झाडाची फांदी हाती लागली. झाडाला पकडून राहिल्यामुळे त्याचा जीव वाचला.
दुसरीकडे नवापुर शहरातून वाहणाऱ्या रगावली नदीला महापुर आल्याचे चित्र दिसून आले. पाण्याची पातळी धोक्याच्या पुढे गेल्याने नदी काठावरील अनेक घरात पाणी घुसून नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून संसार उपयोगी साहित्य वाहुन गेल्याने अनेक परिवार रस्त्यावर आले आहेत. शहरातील सईदा काकर या वयोवृद्ध महिला या पुरात वाहुन गेल्या त्यांचा मृतदेह गुजरातमध्ये आढळला.
यासाठी प्रशासन आणि नातेवाईक यांनी शोध मोहीम राबवली. खोकसा गावात देखील पुराच्या पाण्यामुळे घराची भिंत पडुन वतीबाई बोधल्या गावित यांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे चिचंपाडा गावात पुरुषाचा एक अनोळखी मृतदेह आढळून आला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तर वाघाळीपाडा गावातील काशीराम गावित यांचा मृतदेह देखील आढळून आला.
या पुराच्या पाण्यामुळे अनेक गावातील बंधारे,पुल वाहुन गेले असून अनेक ठिकाणचे रस्ते देखील वाहुन गेले आहेत. एकाच रात्रीतून तालुक्यात १४० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर रगावली नदीत अडकलेल्या अनेकांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
विसवाडी जवळील उची शेवडी लघु तलावाला भगदाड पडले असून त्यामुळ परिसात मोठे नुकसान झाले आहे. सुरत - अमरावती राष्ट्रीय महामार्गावर पाणाबारा जवळील पर्यायी पुल खचल्याने या महार्गावरची वाहतूक सकाळपर्यंत रोखण्यात आली होती.
परिस्थितीचा आढावा घेतल्यानतर विसरवाडी गावातून ही वाहतून नंदुरबार मार्गे वळवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यासह आमदार सुरुपसिंग नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक, उपाध्यक्ष सुहास नाईक, बकाराम गावित नवापूर नगराध्यक्षांसह सर्वपक्षीय नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते हे मदतकार्यासाठी धावून आले. घटनेनंतर पोलीस प्रशासनाने देखील चोख भूमिका बजावली आहे. दरम्यान, रात्रीपासून नवापुर तालुक्याची वीज खंडीत असुन शुक्रवारी उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता. प्रशासनाने देखील तात्काळ पंचनामे सुरू केले आहेत.
बापरे, हॉस्पिटलमध्ये आढळली अजगरची पिल्ले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.