नंदुरबार लोकसभा निवडणूक : डॉ. हीना गावित VS के. सी. पाडवी, जोरदार टक्कर

नंदुरबार लोकसभा निवडणूक : डॉ. हीना गावित VS के. सी. पाडवी, जोरदार टक्कर

उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारची जागा आदिवासीबहुल आहे. भाजपने इथे विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे उमेदवार के. सी. पाडवी यांनी त्यांना जोरदार आव्हान दिलं आहे.

  • Share this:

नंदुरबार, 15 मे : उत्तर महाराष्ट्रातली नंदुरबारची जागा आदिवासीबहुल आहे. यावेळी ही जागा अनुसूचित जातीजमातींसाठी राखीव आहे. भाजपने इथे विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे के. सी. पाडवी हे निवडणूक लढवत आहेत.

हीना गावित यांचं रेकॉर्ड

2014 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. हीना गावित यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव गावित यांचा पराभव करून रेकॉर्ड केलं. त्याआधी माणिकराव गावित हे सलग 9 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

2014 मध्ये हीना गावित यांना 5 लाख 79 हजार 486 मतं मिळाली तर माणिकराव गावित यांना 4 लाख 72 हजार 581 मतं मिळाली. डॉ. हीना गावित या संसदेतल्या तरुण खासदार ठरल्या.

काँग्रेसचं वर्चस्व

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या प्रचाराची सुरुवात नंदुरबारमधून करायच्या. त्यामुळे इतकी वर्षं इथे काँग्रेसचं वर्चस्व होतं. गेल्या निवडणुकीत डॉ. हीना गावित यांनी काँग्रेसची ही मक्तेदारी मोडून काढली.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये शहादा आणि नंदुरबार या जागा भाजपकडे आहेत तर अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व आहे.

जोरदार टक्कर

डॉ. हीना गावित यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित हे नंदुरबारमधून भाजपचे आमदार आहेत तर डॉ. हीना गावित यांनी खासदार म्हणून काम केलं. या निवडणुकीत मात्र काँग्रेसचे के. सी. पाडवी यांनी डॉ. हीना गावित यांना जोरदार टक्कर दिल्याची चर्चा आहे. आता ही जागा पुन्हा काँग्रेसकडे जाते की भाजपच्या हीना गावित खासदारकी राखू शकतात हे 23 मे ला कळेल.

================================================================

VIDEO : नरेंद्र मोदींच्या भावाचं पोलीस स्थानकाबाहेरच आंदोलन, सुरक्षा न दिल्याचा आरोप

First published: May 15, 2019, 3:28 PM IST

ताज्या बातम्या