निलेश पवार, प्रतिनिधी
नंदुरबार, 15 जानेवारी : : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीत बोट बुडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. तर 42 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळं ऐन सणा-सुदीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तेलखेडी गावातील ग्रामस्थ मकरसंक्रांतीच्या निमित्तानं स्थानिक भाविक जलपुजनासाठी बोटीनं नर्मदा नदीवरच्या भुशा पॉईंटवर गेले होते. जलपूजन झाल्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान बोट बुडाली.
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वेगवेगळ्या यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केलीय. आतापर्यंत 42 जणांना पाण्याबाहेर काढण्यात आलं असून 38 जणांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे.
बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. नदीचं पाणी खोल असल्यानं बचावकार्याला वेळ लागत असल्याचं कळतं आहे.