राज ठाकरेंच्या एण्ट्रीनंतर शरद पवारांची भूमिका निर्णायक, नाणार प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी

राज ठाकरेंच्या एण्ट्रीनंतर शरद पवारांची भूमिका निर्णायक, नाणार प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी

नाणार रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

  • Share this:

मुंबई, 8 मार्च : रत्नागिरी राजापूर रिफायनरी प्रकल्प (Nanar Refinery Project) हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या पत्रामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहून या प्रकल्पाला आपलं समर्थन असल्याचं सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी अशी तीन पत्रे लिहिली असून हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलं आहे.

यासंदर्भात आज या प्रकल्पातून बाधित होणाऱ्या 18 गावांचे शेतकरी प्रतिनिधी राज ठाकरे यांचं अभिनंदन करण्यासाठी यांच्या दादर येथील निवासस्थानी आले होते. या लोकांनी प्रकल्पाच्या बाजूने प्रतिक्रिया दिल्याची माहिती आहे.

'प्रकल्पांमध्ये आमच्या गावातील आणि आमच्या स्वतःच्या जमिनी जात आहे. परंतु त्यामुळे कोकणातील लोक आणि परिसर याचा विकास होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमचे समर्थन आहे. या भागातील प्रकल्पाला लागणारी दहा हजार एकर जमिनीपैकी साडेआठ हजार एकर जमीन मालकाने आपले संमतीपत्र या प्रकल्पासाठी दिले आहेत. असं असताना या प्रकल्पाला विरोध असल्याचा भास राजकीय लोकांकडून निर्माण केला जात आहे,' असं या शेतकरी प्रतिनिधींचं म्हणणं आहे.

हेही वाचा - विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस मंत्र्याचे नाव चर्चेत, पण मंत्रिपद सोडण्यास नकार!

'या प्रकल्पाची चर्चा होण्यापूर्वी आणि लोकांनी कवडीमोल किमतीने आसपासच्या परिसरातील जागा विकलेली आहे. त्या लोकांना आता प्रकल्पबाधित म्हणून अधिकार राहिलेला नाही. असेच लोक आता या प्रकल्पाला विरोध करत आहेत. त्यामुळे या लोकांची प्रकल्पात प्रत्यक्ष जमीन जात आहे अशा लोकांचे या प्रकल्पाला समर्थन आहे,' अशी भूमिका आज राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

येत्या काळात या प्रकल्पबाधितांना चांगला मोबदला देण्याचा विचार झाला तर असलेला विरोधही मावळेल अशी प्रतिक्रिया देखील गावकऱ्यांनी दिली आहे. याच लोकांशी भेट घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच आपल्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते शरद पवार यांचा फोन आला होता. त्यांनीया प्रकल्पाला दिलेले समर्थन योग्य असल्याचं म्हटलं आहे आणि याबद्दल ते मुख्यमंत्र्यांना भेटतील असंही म्हटलं आहे. त्यामुळे सध्या तरी नाणार प्रकल्पाचा चेंडू हा शरद पवारांच्या कोर्टात गेल्याचे दिसून येत आहे.

Published by: Akshay Shitole
First published: March 8, 2021, 4:03 PM IST

ताज्या बातम्या