मुंबई 20 फेब्रुवारी : युतीच्या राजकारणात अखेर कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाचा बळी जाणार हे आता निश्चित आहे. नाणार प्रकल्प होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी युतीच्या पत्रकार परिषदेत दिलं होतं. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर तातडीने मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली आणि त्यात सेनेच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं.
नाणार प्रकल्पावरून महाराष्ट्रात रणकंदन माजलं होतं. कोकणात या प्रकल्पाला विरोध होत असल्याने शिवसेनेने त्यात उडी घेतली. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोकण दौऱ्यात हा प्रकल्प रद्द होणारच असं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे प्रकल्प रद्द करण्याच्या अटीवरच सेनेनं युतीसाठी होकार दिला. देशातल्या सर्वाधिक विदेशी गुंतवणूक होणाऱ्या प्रकल्पांपैकी नाणार हा एक प्रकल्प होता.
विरोधामुळे आता हा प्रकल्प नाणारवरून दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात विरोध झाला तर हा प्रकल्प गुजरातमध्येही जाण्याची शक्यता आहे. प्रदुषणाच्या कारणावरून स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता.
तर प्रकल्प गुजरातला जाणार?
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला असाच विरोध होत राहिला तर नाणारचा प्रकल्प अखेर गुजरातला जाईल असा सूचक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला होता. कोकणातील राजकीय नेते नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत.
सरकारमधीलच शिवसेना, तसंच नारायण राणे हे या नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. या प्रकल्पामुळे 1 लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे.पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचं, मासेमारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा दिला होता.
अराम्को कंपनी भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प टाकू इच्छिते. म्हणूनच राज्य सरकारने त्यांना नाणारचा प्रस्तावही दिला होता. पण या प्रकल्पाला विरोध झाल्याने हा 3 लाख कोटींचा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो, तसंही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधीत कंपनीला आमंत्रित केलं आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला होता.
'नाणार' येणे ही भाग्याची गोष्ट'