Home /News /maharashtra /

'अधिवेशन कमी होणं हे लोकशाहीसाठी घातक', नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला थेट घरचा आहेर

'अधिवेशन कमी होणं हे लोकशाहीसाठी घातक', नाना पटोलेंचा महाविकास आघाडीला थेट घरचा आहेर

विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. कोरोना संकटामुळे महाविकास आघाडी सरकारने हे अधिवेशन केवळ पाच दिवसांसाठी घेतलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. पण आता नाना पटोले यांनीच राज्य सरकारला या मुद्द्यावरुन घरचा आहेर दिला आहे.

पुढे वाचा ...
    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 26 डिसेंबर : काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. नाना पटोले आज बुलडाणा (Buldhana) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन (Maharashtra Assembly Winter Session) थेट महाविकास आघाडी सरकारला (Maharashtra Government) टोला लगावला. कमी काळासाठी अधिवेशन घेऊन सरकार विरोधी पक्षाला वाचवण्याच काम करतंय, असं म्हणत नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारला थेट घरचा आहेर दिला. नाना पटोले यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. कोरोना संकटामुळे महाविकास आघाडी सरकारने हे अधिवेशन केवळ पाच दिवसांसाठी घेतलं आहे. त्यामुळे विरोधी पक्षाकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. कमी दिवसांचं अधिवेशन घेऊन सरकार राज्यातील प्रश्न सोडू इच्छित नाही, असा आरोप भाजपने केल्यानंतर, आज बुलढाणा जिल्ह्यात नाना पटोले यांनी स्वतःच्याच महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. कमी दिवसांचे अधिवेशन हे लोकशाहीसाठी मारक असल्याचे म्हणत पुढचे बजेट अधिवेशन तरी पूर्ण काळासाठी घेण्यात यावे, असं नाना पटोले म्हणाले. हेही वाचा : मोठी बातमी! कॅबिनेट मंत्र्याची खुर्ची धोक्यात? काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग नाना पटोले नेमकं काय म्हणाले? "अधिवेशन कमी होणं हे लोकशाहीसाठी घातक आहे. मी विधानसभा अध्यक्ष असतानाही माझी भूमिका स्पष्ट केलेली होती. माझी आजही तीच भूमिका आहे. पण विरोधक या पद्धतीचा आरोप करत असतील तर हा थोतांड आहे. खरंतर विरोधकांनी गेल्या पाच वर्षात जे पाप केलं ते काढायची संधी सत्ता पक्षाच्या आमदारांना मिळाली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. पण सरकारच आता विरोधकांना त्यांचं पाप लपविण्यासाठी मदत करत आहे, अशीही भूमिका घेतली जाऊ शकते. कारण त्यांनी जे काही पाप केलं ते खूप आहे. त्याबाबतचे अनेक मुद्दे आहेत. ते मुद्दे आपल्याला पुढे आणता येतील. म्हणून आम्ही सरकारला सांगतोय की, पुढचं बजेट अधिवेशन आहे. ते पूर्ण काळ चालावं. विधानसभेचं कामकाज करताना या सर्व भूमिका आम्ही मांडणार", असं नाना पटोले म्हणाले. हिवाळी अधिवेशनानंतर काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू? दरम्यान, काँग्रेसच्या गोटात सध्या विविध घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस मंत्र्यांच्या कामकाजाची यादी मागवली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधिवेशनानंतर पुढच्या काही दिवसांत मंत्र्यांच्या कामांची यादी घेऊन दिल्लीला जाणार आहेत. तिथे काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. ज्या मंत्र्यांनी समाधानकारक काम केलंय त्यांनाच मंत्रिपदी ठेवलं जाणार आहे. काँग्रेसच्या जवळपास दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर्व मंत्र्यांच्या कामांची माहिती राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी कोणत्या मंत्र्याला ठेवायचं आणि कुणाला डच्चू द्यायचा याबाबतचा निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे ज्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार त्या मंत्र्यांच्या कामकाजांवर पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचं देखील वृत्त आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या